जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता

मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी प्रशासन लागले कामाला

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम सुरु झाला आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. 26 मार्चपर्यंत प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राज सुरु आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका कधी होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. अखेर ही उत्कंठा संपण्याच्या मार्गावर आहे. मुदत संपणार्‍या, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत, अशा जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि 111 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यामध्ये प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना दाखल करण्याचा कार्यक्रम 24 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर 26 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तलाठ्यांपासून सर्वच मंडळी मतदार यादी तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यानंतर एप्रिलअखेर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविला आहे. या ग्रामपंचायतींचे मतदान मेमध्ये होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ग्रामपंचायतींवर दृष्टीक्षेप

तालुका
सार्वत्रिकपोटनिवडणूक
अलिबाग
3407
मुरूड
0403
पेण
1807
पनवेल
1502
उरण
0802
कर्जत
3007
खालापूर
0302
रोहा
0605
सुधागड
0602
माणगाव
2112
तळा
1804
महाड
3025
पोलादपूर
0012
श्रीवर्धन
1609
म्हसळा
1112
एकूण 240111


Exit mobile version