लिपिकाला 25 हजारांची लाच घेताना पकडले
| मुंबई | प्रतिनिधी |
मंत्रालयाच्या इमारतीतच मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील लिपिकाला 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. थेट मंत्र्यांच्या कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे मंत्रालयासह राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, “चौकशीत माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर मी राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका झिरवाळ यांनी मांडली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याने एका तक्रारदाराचा निलंबित मेडिकल परवाना पूर्ववत करण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. त्यापैकी 25 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्यावर एसीबीने मंत्रालयात सापळा रचला आणि ढेरंगे याला पैसे घेताना ताब्यात घेतले.
कारवाईनंतर एसीबी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या कार्यालयाचा तात्पुरता ताबा घेत तपास सुरू केला. तपास पूर्ण होईपर्यंत कार्यालयाचे कामकाज थांबवण्यात आले. प्राथमिक चर्चेनुसार, आरोपीने लाचेची मागणी करताना मंत्र्यांच्या खासगी सचिवाचे नाव वापरल्याची शक्यता व्यक्त होत आहे; मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप नाही.
इतिहासातील तिसरी मोठी कारवाई
दरम्यान, मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनात एसीबीने कारवाई करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात राजेंद्र दर्डा यांच्या कार्यालयावर अशी कारवाई झाली होती. त्यानंतर भाजपचे नेते एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकावर लाचखोरीप्रकरणी कारवाई झाली होती. आता नरहरी झिरवाळ हे तिसरे मंत्री ठरले असून, त्यांच्या कार्यालयात थेट एसीबीने धडक दिली आहे.
महायुती सरकारसाठी नामुष्की
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारमध्ये आधीच संवेदनशील स्थितीत आहेत. त्यातच थेट मंत्र्यांच्या दालनात झालेली ही कारवाई सरकारसाठी मोठी नामुष्की ठरली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या प्रकाराला मी कुठेही पाठीशी घालणार नाही. मंत्री किंवा पीए यांच्याशी त्याचा संबंध नाही. पण, चौकशीतून काही माझ्यापर्यंत आलं, तर मी राजीनामा देईन.
-मंत्री नरहरी झिरवाळ
