धरणांमध्ये 54 टक्के जलसाठा, पाणीबचतीसाठी प्रशासन अलर्ट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या 28 धरणांमधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडला असला, तरी धरणांमधील जलसाठा कमी होत असल्याने पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची भिती निर्माण झाली आहे. सध्या या धरणांमध्ये 54 टक्के जलसाठा शिल्लक आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावे या धरणांवर अवलंबून असल्याने जलसाठा आणखी कमी झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याबरोबरच अनावश्यक अपव्यय टाळण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने धरणांमधील जलसाठ्यावर सतत लक्ष ठेवले असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याची तयारी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनेक जिल्ह्यामध्ये लघुपाट बंधारे विभागाच्या अखत्यारित 28 धरणे आहेत. त्यात सुधागड तालुक्यात पाच, श्रीवर्धनमध्ये तीन, म्हसळ्यामध्ये दोन, महाडमध्ये चार, खालापूर तीन, पनवेल तीन, कर्जत दोन, उरण, मुरुड, तळा, रोहा, पेण व अलिबाग या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक धरण आहेत. या धरणांमधून, पेण नगरपरिषद, महाड शहर, श्रीवर्धन नगर परिषदेला, महाडमधील 19 गावे, 13 गावे तसेच दुंदरेपाडा, चिंचवली, मोर्बे, आडगाव, आपटी, होराळे, जांभिवली, नंदनपाडा, नारंगी, सावरोली, शिरवली, तांबाटी, डोणवत, गोरठण, तांबाटी, खिरकंडी, ठाकुरवाडी, निगडोल, नडोदे, कलोते, वावर्ले वावंढळ, श्रीगांव, कुर्डूस, कुसूंबळे, पोयनाड, पाभरे, तोंडसुरे, संदेरी, आंबेत, फळसप, बोर्ली, मांडला, भोईघर, काकळघर, काशिद, वैतागवाडी, सोनसडे, भानंगकोंड, कलमशेत, मांदाड, वनास्ते, शेणवली, कार्ले, दिवेआगर, बोर्ली, पंचतन, भरखोल, रानवली, निगडी, गालसुरे, बापवन अशा एकूण 78 गावांना पाणी पुरवठा होतो. लाखो नागरिकांना पाणी पुरवठा या धरणांद्वारे केला जातो. जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला पडला. धरणे, विहीरी, तलावधरणे, तलाव, विहीरी पाण्याने तुडूंब भरून गेल्या. त्यात प्रशासनाकडून वेगवेगळ्या पाण्याच्या योजना राबवून मुबलक पाणी पुरवठा घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच औद्योगिकीकरणामुळे पाण्याचा वापर प्रचंड वाढू लागला आहे. जीर्ण झालेल्या पाईपलाईनची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील याधरणांमधील पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्याचा परिणाम गावांमध्ये पाणी कपातीचे संकट सुरू झाले आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत पाण्याचा साठा धरणांमध्ये शिल्लक राहवा यासाठी कोलाड येथील लघु पाट बंधारे विभागाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यांतील धरणांमध्ये फक्त आता 54 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. आतापासून जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट सुरु झाल्याचे चित्र समोर येत आहे.
धरणांमधील जलसाठा कमी होण्याच्या वाटेवर
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील संदेरी धरणामध्ये शंभर टक्के जलसाठा शिल्लक आहे. सहा धरणांमध्ये 36 टक्केपर्यंत, 17 धरणांमध्ये 76 टक्केपर्यंत, तीन धरणांमध्ये 81 टक्केपर्यंत जलसाठा शिल्लक आहे. मात्र सुधागडमधील ढोकशेत धरणाने तळ गाठला असून या धरणात शुन्य टक्के जलसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. आतापासून या धरणात पाणी नसल्याने पाण्यासाठी वणवण करण्याचीवेळ नागरिकांवर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
शिल्लक जलसाठ्याची टक्केवारी
फणसाड - 60, वावा -81, सुतारवाडी - 78, आंबेघर - 77, श्रीगांव - 54, कोंडगाव - 36, घोटवडे - 18, ढोकशेत - 00, कवेळ - 28, उन्हेरे - 21, कार्ले - 59, कुडकी - 63, रानीवली - 25, पाभरे - 68, संदेरी - 100, वरंध - 57, खिंडवाडी - 58, कोथुर्डे -47, खैरे - 59, साळोख -46, अवसरे - 51, भिलवले - 62, कलोते मोकाशी - 70, डोणवत - 46, मोरबे - 76, बामणोली - 74, उसरण - 66, पुनाडे - 33 टक्के.
पाणी जपून वापरा
धरणांमधील जलसाठा हळुहळू कमी होऊ लागला आहे. काही गावांमध्ये पाणी कपात सुरु आहे. तर काही गावांमध्ये नियमीतपणे पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत धरणांमध्ये पाणी पुरवठा शिल्लक राहवा यासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा,असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाने केले आहे.
नद्या तळ गाठण्याच्या वाटेवर
महाडमधील सावित्री, नागोठणेमधील अंबा, डोलवहालमधील कुंडलिका, लोहपमधील पातळगंगा, कर्जतमधील उल्हास आणि पनवेलमधील गाढी या जिल्ह्यातील सहा प्रमुख नद्या आहेत. सध्या या नद्यांमध्ये 1.36 मी पासून 2.70 मीटर इतक्या पाण्याची क्षमता आहे. या नद्यांमधील पाण्याची पातळी देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे या नद्या तळ गाठण्याच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे.






