महाविकास आघाडीमध्ये धुसफूस

फोडाफोडीमुळे काँग्रेस अस्वस्थ

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

भाजपच्या विरोधात मोट बांधली जात असतानाच परस्परांचे इच्छूक उमेदवार फोडण्याचे प्रकार वाढू लागल्याने महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. महाडमध्ये शिवसेनेने काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांना तसेच पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीने अभिजीत पाटील यांना पक्षात प्रवेश दिल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीतील पक्षालाच कमजोर करण्याचे काम होत असेल तर ते चुकीचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. जितक्या लोकांना घेतलं असेल त्यांना आमच्या पक्षाला परत दिले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. किंवा मग त्या जागेवर आम्ही दावा करू, असंही पटोले म्हणालेत

महाडवर काँग्रेसचाच हक्क
महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाने राज्यातील मविआमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगताप यांना काँग्रेसमधून शिवसेनेत घेऊ नका, असे आपण उद्धव ठाकरेंना सांगितले होते. तरीही हा पक्षप्रवेश झाल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाडवर काँग्रेसनेही आपला हक्क सांगितला आहे.

नाना पटोले म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले होते आपण असं करू नका, परंतु त्यांनी ते केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षालाच कमजोर करण्याचे काम होत असेल तर ते चुकीचे आहे. महाविकास आघाडीची बैठक होईल तेव्हा याविषयावर चर्चा करू. महाडची ती जागा काँग्रेस पक्षच लढवेल असंही पटोलेंनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे महाडच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्नेहल जगताप या माजी आ. माणिकराव जगताप यांच्या कन्या असून त्यांनी महाडचे नगराध्यक्षपदही सांभाळले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर नुकत्याच महाड येथील ठाकरेंच्या सभेत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. इतकेच नाही तर स्नेहल जगताप यांच्यासोबत काँग्रेसचे हनुमंत जगताप, संदीप जाधव, राजेंद्र कोरपे, धनंजय देशमुख, श्रीधर सकपाळ यांनीही ठाकरे गटात प्रवेश घेतल्याने काँग्रेसला धक्का बसला.

सध्या महाड येथे आ. भरत गोगावले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पूर्वी ठाकरेंसोबत असलेल्या भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्यांना पाठिंबा देत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाची ताकद कमकुवत झाली आहे. अशावेळी स्नेहल जगात यांना पक्षात घेत उद्धव ठाकरेंनी गोगावलेंविरोधात रणनीती आखत स्नेहल जगतापांना मविआकडून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यात आता नाना पटोलेंनीही त्याठिकाणी काँग्रेस जागा लढवेल असं सांगितल्याने महाडच्या जागेवर 2 पक्षांनी दावा केला आहे.

राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ वाटपावर पुनर्विचार महाविकास आघाडीमध्ये होणे गरजेचे आहे. पूर्वी ज्या पद्धतीने जागा वाटप झाले आणि त्यात पराभूत व्हावे लागले यावर पुन्हा विचार करावा लागेल. गेल्या जागा वाटपाच्यावेळी शिवसेना हा आघाडीत नसल्याने आता आघाडीतील जागांची संख्या देखील कमी होणार आहे.

नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

सरकार ढिम्म आहे- अजितदादा
राज्यातील शिंदे, फडणवीस सरकार ठिम्म असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातारा येथे केली. ते म्हणाले की, अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी नद्यांना पूर आले, गारपीट झाली, फळबागांचं, बारमाही पिकांचं नुकसान झालं. म्हणे आम्ही मदत करणार. आरे कधी करणार? त्या शेतकऱ्याचा अंत किती बघताय? त्याची सहनशीलता संपली ना. कधी करणार तुम्ही मदत? त्यासाठी तिथे बसून काम करून घ्यावं लागतं. लोकांना अजिबात मदत होत नाहीये. सरकार ढिम्म आहे. आमदार निधी वाटपालाही स्थगिती दिली. काय कारण आहे? मी आमदार निधी 1 कोटीवरून 5 कोटीपर्यंत वाढवला. आम्ही सगळ्या आमदारांना निधी दिला, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

संजय राऊतांवर राष्ट्रवादीची नाराजी
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहिलेल्या अग्रलेखावरुन राष्ट्रवादीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले, असा आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असे सांगितले की, संजय राऊत यांचं म्हणणं आहे. त्यावर मी प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, आम्हाला महाविकास आघाडीची वज्रमुठ टिकवायची आहे. संजय राऊत यांनी वेगवेगळ्या बाजू समजून घेऊन ही वक्तव्य केली असतील असं जयंत पाटील म्हणालेत. या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार, छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील टीका केली आहे.

Exit mobile version