खांब, वाकण नाक्यावर बस थांबा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल

| सुतारवाडी | वार्ताहर |

सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या बारा वर्षापासून पनवेल ते इंदापूर रस्ता रुंदीकरण करण्याच्या नादात खांब, वाकण नाक्यावरील एसटी थांबा शेड गायब झाल्यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पावसाळ्यात पावसापासून बचाव होण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांमध्ये प्रवाशांना आश्रय घेऊन एसटीची प्रतीक्षा करावी लागत असे. एसटी आली की प्रवासी तिथपर्यंत पोहोचेपर्यंत एसटी तेथून निघून गेलेली असते. उन्हाळ्यात, तर प्रवाशांना उन्हापासून बचाव करण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एक तर वाकण नाक्यावर तीनही बाजूंनी वाहने आली की मोठ्या प्रमाणावर धुरळा उडतो. नाका-तोंडात धुळीकण जात असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रतीक्षा करावी लागत आहे. महाडकडे जाण्यासाठी तसेच मुंबई, पाली, रोहाकडे जाण्यासाठी अनेक प्रवाशी भर उन्हात बसची प्रतीक्षा करत उभे असतात. गणपती सण आणि दिवाळी सणामध्ये सुध्दा अशीच परिस्थिती असते. रस्ता रुंदी करण्याचे काम पूर्ण कधी होणार हे अद्याप माहिती नाही, तोपर्यंत प्रवाशांना असाच त्रास सहन करावा लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी तात्पुरती शेड उभारावी अशी मागणी होत आहे.

Exit mobile version