दिघी परिसर नॉट रिचेबल

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

देशातील तीन प्रमुख खाजगी दूरसंचार कंपन्या जीओ, एअरटेल आणि व्ही यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. कंपन्यांचे हे नवे दर 3 जुलैपासून देशात लागू करण्यात आले आहेत. दक्षिण रायगड मधील श्रीवर्धन, दिघी, बागमांडला, हरीहरेश्‍वर, दिवेआगर, म्हसळा, आंबेत परिसरांत फार मोठ्या प्रमाणांत एअरटेलचे ग्राहक आहेत. त्यातच दिघीला व्यवसाय निमीत्ताने येणार्‍यांनी सुध्दा अन्य कंपन्यांचे कनेक्शन एअरटेलला ट्रान्स्फर केले आहे. परंतु, असे असताना दिघी परिसरामध्ये गेली कित्येक दिवस नेटवर्कच्या समस्येमुळे सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत.

काहीच अंतरावरती सुवर्ण गणेश मंदिर असल्यामुळे पावसाळी असंख्य पर्यटक या मार्गाने या स्थळाला भेट देत असतात. त्यांना ऑनलाईन व्यवहार करण्या संदर्भात बर्‍याच समस्या येत आहेत. याच गावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित होणारे अदानी दिघी पोर्टला भेट देणारे असंख्य उद्योजक तसेच ट्रान्सपोर्ट संदर्भात ऑनलाइन व्यवहार, डिझेलचे पैसे व अन्य ऑनलाइन व्यवहार करण्यास जिकरीचे ठरते. या परिसरातील वाड्या, डोंगराळ भागांमध्ये पावसाळी परिस्थिती असल्यामुळे एखादा नागरिक आजारी पडला तर रिक्षा तसेच डॉक्टर सेवा मिळण्याकरिता संपर्क करण्याकरिता नेटवर्क नसल्यामुळे स्थानीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Exit mobile version