तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा

जबाबदार अधिकारी नाही, शिक्षणाचा गाडा कोण हाकणार?

| म्हसळा | वार्ताहर |

शिक्षण हे वाघणीचे दूध म्हणणारे सरकार शिक्षणाचे हेळसांड करताना दिसत आहे. गावोगावी शिक्षण प्रणालीचे कार्य राबवण्याचे कार्य सरकार करत असताना त्याच्यावरती कोट्यवधी रुपयांचा खर्चदेखील केला जातो आणि तो केलेला खर्च शेवटच्या विद्यार्थ्यांच्या घटकापर्यंत पोहचतो की नाही याची पूर्वतपासणी करण्यासाठी प्रशासनाने शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि संपूर्ण शिक्षण विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी गटशिक्षण अधिकारी नियुक्ती केली जाते; परंतु ह्या नियंत्रण पद्धतीचा म्हसळा तालुक्यात खेळखंडोबा झाला आहे.

तालुक्यामध्ये अकरा केंद्र तर दोन बीट असे असताना आज एकही रेग्युलर केंद्रप्रमुख नाही. एकूण दोन बीट असून, एकाही बिटाला गेली अनेक वर्षे विस्तार अधिकारी नाही आणि अकरा केंद्रात एकही रेग्युलर केंद्रप्रमुख नाही, ही म्हसळा तालुका शिक्षण विभागाची खरी शोकांतिका आहे. 2015 पासून गटशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे.

शिक्षण विभागाचा कारभार आजदेखील बेवारस आहे. कारण, ज्या केंद्रामध्ये रिक्त पद आहे, त्या केंद्रामध्ये तालुक्यातील हौशी दांडी मास्तर जे अधिकार्‍यांचे असणारे लाड पुरवतात, त्यांना प्रभारी केंद्रप्रमुख पद बहाल केले आहे, अशी चर्चा आहे. त्यातील काही प्रभारी केंद्रप्रमुख हे जीवतोड प्रामाणिकपणे काम करतात, तर काही केंद्रप्रमुख आपल्याला भेटलेल्या पदाचा वापर केंद्रप्रमुखाच्या नावावरती शिमगा उत्सव करत असल्याचे संकेत तालुक्यात वर्तवले जात आहे. आपली शाळा रंगरंगोटी करून बाह्य रूपाने चकाचक करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक दर्जा याकडे लक्ष न देता आपली शाळा कशी प्रगत होईल असे आव आणणारे काही मोजके शिक्षक आजही तालुक्यामध्ये बिनधास्तपणे संबंधित अधिकार्‍यांच्या वरदहस्तामुळे वावरत आहेत. या सार्‍या गोष्टींवरती लक्ष ठेवणारे गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी हेच जर नसतील, तर म्हसळा तालुका शिक्षणाच्या मूळ प्रवाहातून वेगळा झाल्याची चर्चा शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना या व्यथा माहीत असूनही जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे.

एकाच केंद्रातील दोन-दोन शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेवरून काढून केंद्रप्रमुखपदी नेमणूक करून विद्यार्थ्यांचे वाटोळे करण्याचा हा प्रयत्न आहे की काय, अशी चर्चा सर्वसामान्य पालकांकडून ऐकावयास मिळते. तालुक्यातील शिक्षण विभागाची दुरवस्था दर्शविणारी आकडेवारी खालीलप्रमाणे असून केवळ प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यामुळे खासगी शाळांकडे विद्यार्थी पाठविण्याची वेळ सर्वसामान्य पालकांवर आली आहे.

महत्त्वाची पदे रिक्त
गटशिक्षणाधिकारी 1
वरिष्ठ विस्तार अधिकारी 1
कनिष्ठ विस्तार अधिकारी 1
केंद्रप्रमुख 11
मुख्याध्यापक 4
वरिष्ठ सहाय्यक 1
कनिष्ठ सहाय्यक 1
शिपाई 1
एकूण 22 मंजूर पदांपैकी पैकी सर्वच्या सर्व पदे रिक्त आहेत. हा म्हसळा तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या प्रगतीचा उतरता आलेख आहे.
Exit mobile version