। म्हसळा । वार्ताहर ।
भारत सरकारच्या निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानची अंमलबजावणी करण्यासाठी म्हसळा तालुक्यात इयत्ता पहिली ते तिसरीला शिकवणारे सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल व जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज येथील सभागृहात गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यशाळेसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पनवेलचे ज्येष्ठ अधिव्याख्याता सागर तुपे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वैष्णवी कळबास्कर, प्रा.प्रकाश हाके आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील पहिली ते तिसरी ला शिकविणार्या 141 शिक्षक आणि 108 अंगणवाडी सेविका, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख साधनव्यक्तींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप भोनकर यांनी केले तर नंदकुमार जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.