तानाजी सावंत यांचे स्पष्टीकरण
| पुणे | वृृत्तसंस्था |
जिल्हा स्तरावर तातडीने औषध खरेदीचा आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला असून ती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात आता औषधांचा किंवा सलाइनचा तुटवडा पडणार नाही, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमात सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी ही माहिती दिली. संपूर्ण राज्यात 15 ऑगस्टपासून मोफत औषध आणि उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागातील रुग्णांची संख्या तिप्पट वाढली. त्यामुळे साहजिकच संबंधित केंद्रात महिनाभर पुरणारा औषधांचा आणि सलाईनचा साठा आठवड्यातच संपायला लागला. त्यामुळे याविरोधात सर्वत्र ओरड करण्यास सुरुवात झाली होती.
राज्यात औषधे कमी पडत आहेत, असा एकही अहवाल माझ्यापर्यंत पोचलेला नाही, असेही सावंत यांनी नमूद केले. 2012 पासून आरोग्य विभागाची बिंदूनामावली तयार नव्हती. तीन महिन्यापूर्वी बिंदूनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ती लवकरच पूर्ण होईल. संचालकपदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांत ती पदे भरली जातील, असेही त्यांनी सांगितले.