जिल्हा परिषद शाळांमध्ये डायटचा उपक्रम; मुलांचा दर आठवड्याला अभ्यास आणि मूल्यांकन
। रायगड । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही दर आठवड्याला त्यांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे. तसेच, दर आठवड्यातील प्रगतीचे मूल्यांकन करून 30 जूनपूर्वी प्रत्येक विद्यार्थी हा भाषा व संख्याज्ञानात परिपूर्ण करण्यासाठी अभ्यास बंधनकारक असणार आहे.
जिल्हा परिषद शाळांत अप्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप अधिक आहे. सातत्याने अप्रगत विद्यार्थी पुढील वर्गात ढकलले जातात. यावर्षी मात्र, शिक्षण खात्याने या प्रकाराला पायबंद घालण्याचे ठरवले आहे. नियमित अध्यापनाचे कार्य संपत असताना इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची याच महिन्यापासून विशेष तपासणी सुरू झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनस्तर निश्चित करून त्याबाबतची घोषणा केली जाणार आहे. ही घोषणा झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाची वैयक्तिक तयारी करवून घेण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकावर सोपवली जाणार आहे.
* मार्च महिन्यापासून विशेष तपासणीला सुरवात
* दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश
* दर आठवड्याला अभ्यासाची प्रगती तपासणे बंधनकारक
* शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा तपासणी अहवाल सादर होणार
* 100 टक्के अध्ययन क्षमता विकसित होणे गरजेचे
* भाषा ज्ञान व संख्याज्ञानाची आठवड्याला परीक्षा
* उन्हाळी सुट्टीतील मोहिमेचा 30 जूनला अंतिम मुदत
* शिक्षकांनी सुट्टीतही मोहीम पूर्ण करणे गरजेचे
* अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगतीच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न
* अप्रगत विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलणे बंद
*अभ्यासाची तयारी करूनच नव्या वर्षात प्रवेश.
नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना संख्याज्ञान व भाषिक ज्ञानाच्या बाबतीत परिपूर्ण करण्यासाठी ही मोहीम आखली गेली आहे. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना या तपासणीला सामोरे जावे लागेल. तसेच शिक्षकांना विद्यार्थीनिहाय प्रगती करता यावी यासाठी नियोजन केले गेले आहे.
प्रा. रामदास टोणे,
अधिव्याख्याता, डायट, रायगड.