| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील टेमघर येथील 19 वर्षीय युवक सुहेल सलीम शेख हा कुसगाव येथील वहाळेवर बांधलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला असताना बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती. दि.5 जुलै रोजी सायंकाळी 4.00 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तीन दिवस उलटले तरी सुहेलचा शोध लागलेला नाही, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुहेल आपल्या चार मित्रांसोबत कुसगाव येथील बंधाऱ्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता. पोहून झाल्यानंतर सर्व मित्र बाहेर निघत असताना, सुहेलने बंधाऱ्यात पुन्हा एक शेवटची उडी मारली. मात्र, पाणी खोल असल्यामुळे तो बुडू लागला. आपल्या मित्राला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी दोन मित्रांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली. सुहेल हाताला लागलाही होता; परंतु, बंधाऱ्यावरून पडणाऱ्या प्रवाहामुळे तो निसटला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो बेपत्ता झाला असल्याचे मित्रांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली असून, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून एमआयडीसी पोलीस, आपदा मित्र आणि सी स्कॅप महाड यांच्यामार्फत सुहेलचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस थांगपत्ता न लागल्याने प्रशासन आणि कुटुंबीयांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.







