कर्मचार्यांच्या दुरुत्तरांमुळे ग्रामस्थ संतप्त
। म्हसळा । वार्ताहर ।
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी 43 कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळून लघु पाटबंधारे विभाग कोलाडच्या अंतर्गत असलेल्या पाभरे धरणातून म्हसळा नगरपंचायतीला पाणी पुरवठा करायचा आहे. या प्रकल्पाचे काम धरण साठवण क्षेत्रांत सुरु असून ते पारदर्शक नसल्याने तात्काळ थांबवावे, अशी मागणी सरपंच पाभरे, अतीफ उकये, अमोल कदम, रुपेश घडशी, विनोद सुतार, गणेश चिपकूणकर आणि ग्रामस्थांनी केली आहे.
सद्यस्थितीत पाभरे धरणातून म्हसळा नगरपंचायतीसह तोडसुरे प्रादेशिक नळ योजनेमधील गावांतील 20 ते 22 हजार नागरिकांना पाणी पुरवठा होत असतो. या सर्व योजनांना धरणक्षेत्र सोडून अन्य जागेत बांधलेल्या जॅकवेलद्वारे पाणी पुरवठा होतो. नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी 43 कोटी रुपयांच्या या नवीन योजनेत धरणाच्या मूळस्त्रोतातून इनटेक वेलने आणि नंतर जॅकवेल 75 पंपाने पाणी पुरवठा होणार आहे. सर्व योजना धरण क्षेत्राबाहेरीक जॅक वेलने होत असताना नव्याने धरण साठयांत होणारी इनटेक वेल पाभरे पंचक्रोशीसाठी कळीचा मुद्दा ठरत आहे. त्याच कारणांनी ग्रामस्थ साईटवर गेले असता रविराज इंजीनीअर्स कोल्हापूर आणि निर्सग कन्सलटंटचे साईटवरील कर्मचार्यांनी दिलेल्या दुरुत्तरांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.
महाराष्ट्र जिवन प्राधिकरण आणि नगरपंचायत प्रशासनाचा समन्वय नसल्याने धरणातील पाणीसाठा संपण्याची भिती ग्रामस्थांना वाटत आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी योग्य आणि पारदर्शक माहितीचा फलक नसल्याने पाणीसाठा तालुक्यातील नियोजीत गोंडघर एमआयडीसीकडे वळविला जाण्याची भिती ग्रामस्थांना वाटत आहे. लघुपाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण आणि नगरपंचायत प्रशासनाने एकत्रित बसून कार्यान्वित आसणार्या अन्य योजनाना पाणी पुरवठयाबाबत लेखी हमी द्यावी, अशी पाभरे ग्रामस्थांची मागणी आहे .