पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही

विकतच्या पाण्याने विधी करण्याची नामुष्की

| पनवेल | प्रतिनिधी |

एकीकडे पनवेल महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे मात्र अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने, नातेवाईकांना चक्क बिसलेरीच्या (पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर) बाटल्या विकत आणून अंतिम विधी करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या ढिसाळ कारभारामुळे मृतांच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलच्या अमरधाम स्मशानभूमीत एकाच वेळी दोन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले होते. मात्र, स्मशानभूमीतील नळांना पाणीच नव्हते. अंत्यविधीच्या वेळी पाण्याचा तुटवडा जाणवल्याने नातेवाईकांनी तात्काळ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी आणि टँकरसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनाकडून वेळेत टँकरही उपलब्ध करून देण्यात आला नाही. दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या नातेवाईकांना प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अंत्यसंस्काराची वेळ टळत असल्याने आणि पाणी मिळण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने, अखेर नातेवाईकांनी धावपळ करत बाहेरून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत आणल्या आणि विधी पूर्ण केला. “माणूस जिवंत असताना पाण्यासाठी वणवण करावी लागतेच; पण मृत्यूनंतर अंतिम संस्कारासाठीही पालिकेला पाणी देता येत नसेल, तर या प्रशासनाचा काय फायदा?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी मूलभूत सुविधांची अशी दैना असणे अत्यंत लाजीरवाणे असल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकरणावर आता पनवेल महानगरपालिका प्रशासन काय कारवाई करणार आणि दोषींवर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version