शुक्रवारी पुढील सुनावणी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शिवसेनेच्या फुटीनंतर धनुष्यबाण या पक्षचिन्हासाठी सुरु असलेल्या संघर्षावर मंगळवारी (दि.17) केंद्रीय निवडणूक आयोग अंतिम निर्णय देऊ शकले नाही. पुढील सुनावणी आता शुक्रवारी (दि.20) होणार आहे. कागदपत्रे खरी असतील तर शिंदे गटाची ओळख परेड करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली तर मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन आणि इतर तांत्रिक गोष्टी तपासून शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे कोणत्या गटाकडे जाणार यावर निर्णय येणं अपेक्षित होतं पण निर्णय येऊ शकलेला नाही.
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना शिवसेनेतला कोणतागी गट नाही तर कपोकल्पित आहे. शिवसेनेतील फूट म्हणजे कल्पना आहे. शिवसेनेत दाखवलेल्या फुटीला काहीही अस्तित्व नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे. शिवसेनतील फुट आयोगाने ग्राह्य धरु नये, असा दावा केला. शिंदे गटाने दाखल केलेली कागदपत्रं बोगस आहेत. या कागपत्रांमध्ये त्रुटी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा. तसेच काही लोकांनी पक्षातून बाहेर पडणे हे बेकायदेशीर आहे.
शिंदे गटाची कागपत्र खरी असतील तर ओळख परेड करा, अशी महत्वाची मागणी सिब्बल यांनी केली. लोकप्रतिनिधी आणि पक्ष वेगळा आहे. आमदार, खासदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे आधी न्यायालयाचा निर्णय येऊ द्या, अशी मागणीही त्यांनी केली. सर्व आमदार, खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद करताना शिंदे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे चिन्हाचा निर्यण तातडीने घ्यावा. पक्षाचा मोठा गट लोकप्रतिनिधींसोबत बाहेर पडल्यास तो बेकायदेशीर कसा, असा प्रश्न उपस्थित केला.
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा सिब्बल यांचा दावाही महेश यांनी फेटाळला आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत आवश्यक आहे ते बहुमत शिंदे गटाकडे असल्याचं जेठमलानी म्हणाले.