मिनीट्रेनचा एसी सलून डबा धूळखात उभा

| माथेरान | प्रतिनिधी |

पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या माथेरानच्या मिनीट्रेनला अत्याधुनिक विशेष एसी सलून डबा जोडण्याचा निर्णय मध्यरेल्वेने 2 फेब्रुवारीला घेतला होता. मात्र अडीच महिने उलटले तरी अद्याप त्या कोचचे एकही आरक्षण झालेले नाही. जास्त तिकीट दर आणि ऑनलाईन बुकिंगच्या सोयीअभावी एसी सलून डब्याचे आरक्षण होत नाही. त्यामुळे तो माथेरानच्या रेल्वे ट्रॅकवरच धूळ खात उभा आहे. सध्या सलून डब्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत.

नेरळ-माथेरान टॉय ट्रेन शंभर वर्षांहून जुनी आहे. देशातील मोजक्या पर्वतीय रेल्वेपैकी एक आहे. माथेरान मुंबईकरांसाठी सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथे मिनीट्रेन मधून प्रवास करणार्‍या पर्यटकांना अत्याधुनिक सुविधा देण्याऐवजी महागडा सलून डबा रेल्वेने आणला आहे. त्या डब्याचे भाडे 32 ते 45 हजार रुपयांच्या घरात आहे. साहजिकच पर्यटकांनी या मुळे त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. येथे या सलून डब्यासाठी 32 ते 45 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. सोमवार ते शुक्रवार असे 32 हजार 88 रुपये भाडे आकारले आहे. यात प्रतितास दीड हजाराने पैसे आकारले जातात. दर वीकेंडला रात्रभर मुक्कामासह राऊंड ट्रीपच्या प्रवासासाठी 44 हजार 608 रु. भाडे करांसह आकारले जाते.

या वातानुकूलित सलून डब्यासाठी मुख्य बुकिंग पर्यवेक्षक आणि नेरळ किंवा मध्य रेल्वेवरील कोणत्याही जवळच्या स्थानकांवर यूपीआय, पीओएस किंवा रोख रकमेद्वारे आरक्षण करता येते. नेरळ व्यतिरिक्त इतर कुठे स्थानकावर पैसे भरले असतील तर त्याचा पावती क्रमांक नेरळ कार्यालयात जमा केल्याच्या एक दिवसाच्या आत कळवावे लागते. अश्या प्रकारची एसी डब्याची किचकट आरक्षण प्रणाली व ऑनलाईन बुकिंग सुविधा नसल्याने सलून डब्याचे एकही आरक्षण झालेले नाही अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. त्याच बरोबर येथे नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या वातानुकूलित सलून डब्यातून प्रवाशांनी प्रवास करावा म्हणून रेल्वे अधिकार्‍यांच्या येथे बैठका सुरू आहेत. याचा तिकीट दर कमी करण्यापासून ऑनलाईन सुरक्षा सुविधा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात येथे कोणतीही घोषणा झालेली नाही.

आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी मिनी ट्रेनला वातानुकूलित सलून डबा जोडला आहे. प्रवाशांनी त्याचे आरक्षण करून माथेरान मिनी ट्रेनचा आनंद घ्यावा.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
Exit mobile version