प्रशासन आणि प्रसार माध्यमांमध्ये सुसंवाद हवा

ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांचे प्रतिपादन
नवी मुंबई | वार्ताहर |
प्रशासनात अनेक चांगले उपक्रम आणि इतरांना मार्गदर्शक कामे उभी राहतात. परंतु याबद्दलची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे प्रशासनाबद्दल माध्यमांत गैरसमज होतो. प्रशासनातील कार्यसंस्कृती आणि प्रसार माध्यमे यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. असे उदगार साम टिव्हीचे संपादक प्रसन्न जोशी यांनी काढले.
कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ कोकण भवन शाखा यांच्या विद्यामाने आज संवाद कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात ते बोलत होते. यावेळी दैनिक सकाळ मुंबईचे संपादक श्री.संदीप काळे यांनीही अधिकार्‍यांशी संवाद साधला.
श्री.जोशी म्हणाले की, प्रशासनाने सोप्या पध्दतीने प्रसार माध्यमांना माहिती पुरविली तर माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात येणार्‍या माहितीच्या अर्जांचे प्रमाण कमी होतील. प्रशासनाने पत्रकारांशी संवाद साधून त्यांना परिपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांनी सुध्दा प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतूक करणेही गरजेचे आहे. असेही त्यांनी सुचविले.

माध्यमांनी मांडलेले सामाजिक प्रश्‍न सोडविण्याची भूमिका शासन नेहमीच बजावते. प्रसार माध्यमे ही खर्‍या अर्थाने समाजमनाचा आरसा दाखविण्याचे काम करतात. या परिसंवादातून प्रशासन व प्रसार माध्यमे यामधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल,
प्रसन्न जोशी,ज्येष्ठ पत्रकार

यावेळी उपायुक्त (विकास) श्री.गिरीश भालेराव, राज्यकर उपायुक्त डॉ.विलास नागरगोजे, सहाय्यक आयुक्त मनिषा देवगुणे राज्यकर उपायुक्त रामोजी ठोंबरे, उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, तहसिलदार माधुरी डोंगरे, कमलेश नागरे, अस्मिता जोशी आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version