नांदगावची माघीउत्सव यात्रा होणारच

विशेष सभेत ग्रामस्थांचा निर्धार
| कोर्लई | वाताहर |
नांदगावच्या प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायकाच्या माघी उत्सवानिमित्त मंदिरा जवळ दरवर्षीप्रमाणे भरविण्यात येणारी यात्रा यावर्षी कोरोना व अन्य कारणांमुळे रद्द करण्याच्या मंदिराच्या चिटणीस -गुप्ते कौटुंबिक ट्रस्टने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध नांदगाव ग्रामस्थांनी एल्गार पुकारुन ही यात्रा होणारच! असा निर्धार ग्रामस्थांनी आज नांदगावच्या ग्रामपंचायतीत आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सभेत केला.

मंदिराच्या चिटणीस -गुप्ते कौटुंबिक ट्रस्टने नांदगाव ग्रामपंचायतीला एक पत्र पाठवून चालू वर्षी 25 जानेवारी रोजी होणार्‍या माघी उत्सवादरम्यान मंदिरा समोरील पटांगणात यात्रा भरणार नाही असे कळविले. त्यामुळे नांदगावमधिल ग्रामस्थ संतप्त झाले. सदर निर्णयाविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला. ग्रामपंचायतीतर्फे गुरुवारी कार्यालयात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते . सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच विद्याधर चोरघे होते.या प्रसंगी सभेला उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी सभेत चिटणीस -गुप्ते कौटुंबिक ट्रस्टच्या या निर्णयाचे अक्षरशः वाभाडे काढले.अनेकांनी तीव्र शब्दात या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त करीत काहीही झाले तरी यात्रा होणारच असा निर्धार केला.

सदर प्रसंगी ट्रस्टच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरुन बोलणी करुन संतप्त ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया ऐकवताच त्यांनी आपण पाठवलेले पत्र मागे घेत असल्याचे सांगितले.तसेच ग्रामस्थांच्या यात्रा समितीने यात्रेचे नियोजन करण्याचे सुचविल्याने तुर्त या वादावर पडदा पडला असला तरीही ट्रस्टी व यात्रा समितीची एक संयुक्त बैठक येत्या रविवारी घेण्यात येणार आहे.

सभेत यात्रा समितीची स्थापना करण्यात आली आहे. शुक्रवारी या समितीची स्वतंत्र बैठक होऊन त्यात पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे. सभेला ग्रामस्थांची अलोट गर्दी झाली होती.यावेळी ग्रामसेवक गुरुप्रसाद म्हात्रे, सदस्य भाई सुर्वे, सचिन पाटील, नितेश रावजी, विक्रांत कुबल, उमाकांत चोरघे, अल्पा घुमकर, नरेश कुबल,प्रतिक दळवी, सुदेश वाणी, सतिश देशपांडे, शैलेश खोत,मुअज्जम हसवारे, अमोल कोतवाल बबन माळी, जितेंद्र दिवेकर, अशोक पाटील, सुदेश घुमकर, राजन पुलेकर, विकास देशपांडे महेंद्र चौलकर, विनोद जोशी, कल्पेश मळेकर,उदय खोत आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version