रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी, वादग्रस्त भाषणांवर चर्चा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या जयंतीनिमित्त मिरवणुकांसह वेगवेगळे कार्यक्रम, सभा घेतल्या जातात. या सभांमार्फत काही वादग्रस्त भाषणे करून जातीय कलह निर्माण होण्याचा धोका अधिक असतो. यावर अंकुश ठेवण्यासाठी आता निमंत्रित पत्रिकेवर असलेल्या मान्यवरांना पोलिसांकडून नोटीस दिली जाणार आहे. त्यांना नियमावली आखली जाणार आहे. याबाबत जिल्हा समितीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. झालेल्या बैठकीत सूचना देण्यात आली.
जिल्हा शांतात कमिटीची बैठक अलिबागमधील जिल्हा नियोजन समितीच्या भवनमधील सभागृहात गुरुवारी (दि.27) दुपारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, रायगड शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबागचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनित चौधरी, पेणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदींसह वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या बैठकीमध्ये अलिबाग, महाड, खालापूर, पेण, सुधागड, म्हसळा, रोहा अशा अनेक तालुक्यांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या. त्यामध्ये वाहतूक कोंडी, पाण्याचा प्रश्न, काही कंपन्यांतील अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी, सोशल मीडियाद्वारे भडकावू मेसेज करणे, सार्वजनिक ठिकाणी जातीय कलह निर्माण करणे, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांसह महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
जिल्ह्यात शांतता राखा - आदिती तटकरे
पंधरा दिवसांच्या कालावधीत वेगवेगळे सण, उत्सव जयंती सोहळे जिल्ह्यामध्ये साजरे होणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यामध्ये पर्यटक येण्याचा ओघदेखील आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पर्यायी व्यवस्था करणे. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये काही मान्यवरांकडून वादग्रस्त भाषण केली जातात. जिल्ह्यात शांतता राखण्याची त्यांचीदेखील सामूहिक जबाबदारी आहे. वाहतूक कोंडी, पाणी या प्रश्नांवर त्या त्या विभागाने योग्य ती उपाययोजना करून गावात, शहरात व परिसरात शांतता राहील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी केले.
पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील
रायगड जिल्ह्यामध्ये धरणांमधील जलसाठा कमी होऊ लागला आहे. पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांबरोबरच जयंती उत्सवामध्ये स्थानिकांसह मुंबई, पुणे येथे नोकरी व्यवसायनिमित्त असणारी मंडळीदेखील सहभागी होतात. वाढत्या जनसमुदायामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली. जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागांसह नगरपरिषद, नगर पंचायत व एमआयडीसी आदी यंत्रणाच्या मदतीने मुबलक पाणीपुरवठा या कालावधीत उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत.
सीसीटीव्ही कॅमेर्यांबाबत दर आठवड्याला घेणार आढावा
जिल्ह्यातील मोजक्याच तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर, काही ठिकाणी कॅमेरे बसविण्याबाबत मंजुरी दिली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दर आठवड्याला जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेर्यांबाबत आढावा बैठक पोलीस व जिल्हा प्रशासनामार्फत घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. तसेच अन्य ठिकाणी ड्रोन कॅमेर्यांचीही मदत घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.