सहकार विभागाचा छापा; अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त
। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
छत्रपती संभाजीनगर येथील नंदनवन कॉलनीत सहकार विभागाने टाकलेल्या छाप्यात महिलेच्या घरात अवैध सावकारीचे घबाडच हाती लागले. व्याजाने पैसे दिल्या-घेतल्याच्या अनेक कर्जदारांचे आधारकार्ड, कोरे चेक, बाँड आदी दस्ताऐवज आढळून आले. हे छापासत्र बुधवारी (दि. 26) सायंकाळी सातपर्यंत महिला सावकाराच्या घरासह कपड्याच्या दुकानातही सुरू होते. सहकार आणि वन विभागाच्या अधिकार्यांनी पंचनामे केले.
चारुशीला प्रभाकर इंगळे (न्यू नंदनवन कॉलनी, जयसिंगपुरा) असे अवैध सावकार महिलेचे नाव आहे. चारुशीला सात वर्षांपासून सावकारी करत असल्याचे समोर आले आहे. घरकाम करणार्या महिला, पिको फॉल, शिवणकाम करणार्या महिला, मोलकरणी, कंपनीत काम करणारी मुले यांना चारुशीलाने चक्रवाढ व्याजाने पैसे दिले होते. कर्जदाराकडून व्याजाचे पैसे मिळण्यास उशीर झालाच तर एक हजार रुपयांना 100 रुपये दंड लावत वसुलीसाठी कर्जदाराच्या दारात जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेत घाबरवणे, विष घेण्याचा प्रयत्न करणे, मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करणे, वारंवार फोन करून पैशांचा तगादा लावणे, असे प्रकार करीत असे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकार्यांनी छाप्यात सावकारीसंदर्भात अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले. पाच रजिस्टर, दोन लेजरबुक, पाच ज्वेलर्सच्या पावत्या, सहा करारनामे, खरेदीखते, छोट्या-मोठ्या डायर्या, वह्या, दोन नोटपॅड, चारुशीलाच्या नावाचे पाच बँकांचे पासबुक, मुलीच्या नावाचे दोन पासबुक आणि पतीच्या नावाचे तीन बँकांचे पासबुक, 50 महिलांचे बँक पासबुक, कोरे धनादेश, कर्ज दिल्याच्या नोंदवह्या, सोने तारण ठेवून कर्जापोटी पैसे दिलेल्या नोंदी, व्याजाचे पैसे जमा-बाकी असल्याच्या नोंदी, हप्ता व दंडाची नोंद असणारी वही, हप्ता व भिशीच्या नोंदी, जमिनीसंदर्भातील संमतिपत्र आदी दस्तऐवज सापडले आहेत.
अशी होती चक्रवाढ व्याजाची पद्धत
कर्जदारांनी सांगितले, की एक लाख रुपये कर्ज घेतले तर चारुशीला कर्जदाराच्या हातात 90 हजार रुपयेच टेकवत होती. त्यानंतर लगेचच दुसर्या महिन्यापासून 30 हजार रुपये प्रतिमहिना केवळ व्याजापोटी द्यावे लागत होते. अनेकांना हे शक्य झाले नाही. त्यामुळे चारुशीलाने अनेक कर्जदारांचे बँकेचे कोरे धनादेश, घराची कागदपत्रे जमा करून घेतले.
सावकारीसाठी दुकानाचा वापर
चारुशीलाच्या घरापासून जवळच रिद्धिका साडी सेंटर नावाने कपड्याचे दुकान आहे. दुकानात कपडे कमी आणि इतर साहित्यच अधिक विक्रीस असल्याचे समोर आले. घरझडतीपेक्षा दुकानात सावकारीचे अनेक पुरावे सापडले. सावकारीसाठीच या दुकानाचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.