अलिबागमध्ये इतक्या तासांचे होईल भारनियमन; अधिकार्‍यांनी दिली माहिती

अलिबागकरांवर भारनियमनाची टांगती तलवार
। अलिबाग । सायली पाटील।

महावितरणने भारनियमनाचे निकष बदलल्यामुळे यापुढे सरसकट भारनियमन रद्द करण्यात आले आहे. परिस्थिती उद्भवल्यास भविष्यात फिडरनुसार भारनियमन होणार असून, वीजबिलाची वसुली हे महावितरणच्या अजेंडयावर असणार आहे. ज्या भागातील वसुली कमी त्या भागातील ग्राहकांना भारनियमनाचे जास्त चटके सहन करावे लागणार आहेत. सध्या तरी अलिबागकरांवर भारनियमनाची टांगती तलवार कायम आहे. परंतु, जर भारनियमन झालेच तर 24 तसातील दीड तासाचेच भारनियमन होणार असून उसर गावात मात्र साडेतीन तास वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे प्रस्तावित केले आहे.

वीजचोरी व पैसे वसूली याच्या आधारावर भारनियमनाच्या वेळेचे वर्गीकरण करण्यात आले आहे. या वर्गीकरणामध्ये ए, बी, सी, डी, इ, एफ, जी असे सहा गट केले असून त्यामध्ये उपगट आहेत. या वर्गीकरणानुसार अलिबाग तालुक्यातील उसर गाव वगळता बाकी सर्व गावं ए गटात मोडतात. त्यामुळे अलिबाग तालुक्यात सर्वत्र केवळ दीड तासाचेच भारनियमन होणार असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. तसेच उसर गावातील वीजचोरी व पैसे वसूलीची आकडेवारी पाहता हे गाव इ या गटात मोडत असून या गावात साडेतीन तास भारनियमन होणार असल्याचे सांगण्यात आले.

ऐन उन्हाळ्यात घामाच्या धारा
उन्हामुळे नागरिक आधीच हैराण झाले आहेत. त्यात वीज भारनियमनामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार आहे. अशात दिवस कसे काढायचे? असा प्रश्‍न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून कोणत्याही प्रकारचे भारनियमन झाले नसून त्याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना आल्या नाहीत. त्यामुळे त्याबाबत भविष्यातील विचार करून व्यवस्थापनाचे कामकाज सुरू आहे.

कमलाकर अंबाडे, उपकार्यकारी अभियंता, अलिबाग विभाग 2
Exit mobile version