। अलिबाग । प्रमोद जाधव ।
प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची भुमिका घेतल्याने महाडमधील प्रेयसीचा गुरुवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रेयसी व प्रियकराने झाडावर मारण्याचे औषध पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. त्यात तिचा मृत्यू झाला असून प्रियकर मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.
मयत मुलगी ही महाड येथील राहणारी होती. त्याच गावात तिचा प्रियकर देखील राहणारा आहे. गेल्या अनेक वर्षापासून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतू तिच्या घरातील मंडळींनी अन्य मुलासोबत लग्न ठरवले. तिचा साखरपुडादेखील झाला. एकमेकांपासून दुर होणार असल्याने महाडमधील या प्रेमीयुगलांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.
गेल्या चार दिवसापुर्वी परिसरातील एका मंदिरात दोघे भेटले. झाडावर मारण्याचे विषारी औषध त्या ठिकाणी दोघे प्यायले. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांना महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अधिक उपचारासाठी त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. परंतू तिच्या प्रियकराची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईमधील दवाखान्यात हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.