| पनवेल | वार्ताहर |
मेल एक्स्प्रेसमध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील त्रिकुटाला लोहमार्ग पोलिसांच्या भायखळा विशेष कृती दलाने (एसटीएफ) अटक केली आहे. रामईश्वर कुमार नंदलाल साहानी (28), खुबलाल कैलास महतो (28) व बिनोद सोनाराम महतो (28) अशी या त्रिकुटाची नावे असून पनवेल, त्रिसुर, कोकण रेल्वे आणि कोटाव्यम रेल्वे स्थानकांत त्यांनी केलेल्या चोरीच्या सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.
मेल-एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे पर्स, मोबाईल तसेच इतर किमती वस्तू चोरण्याचे प्रकार वाढले होते. एप्रिल महिन्यामध्ये एर्नाकुलम निझामुदिन एक्स्प्रेसमध्ये मडगाव ते दिल्ली दरम्यान एका महिलेची दागिने तसेच रोख रक्कम चोरण्यात आली होती. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तर भायखळा येथील विशेष कृती दलाकडून (एसटीएफ) देखील समांतर तपास सुरु करण्यात आला होता. या तपासादरम्यान एक्स्प्रेसमध्ये हॉकर्सचा धंदा करणारे काहीजण झोपलेल्या प्रवाशांचे पर्स, मोबाईल चोरत असल्याची माहिती एसटीएफ पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एसटीएफच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. एसटीएफच्या पथकाने त्यांच्या कडून 4 लाख 50 हजारांचे सोन्याचे दागिने, 21 हजार रुपये किमतीचे घड्याळ, 3 लाख 27 हजारांचे 17 मोबाईल फोन, 52 हजारांचा टिव्ही असा 8 लाख 58 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.