दुर्गरत्न प्रतिष्ठानची यशस्वी कामगिरी
| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर शिवकालीन चोर दरवाजा सापडला आहे. हा चोर दरवाजा शोधण्याची यशस्वी कामगिरी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी बजावली आहे. तळगडावर कित्येक वर्ष मातीत लुप्त झालेल्या चोर दरवाजाबद्दल प्रतिष्ठानच्या सदस्यांना माहिती मिळाली असता काही अभ्यासकांकडून गडाची माहिती घेण्यात आली. त्यानंतर नकाशाच्या सहाय्याने चोर दरवाजाची शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर या शोध मोहिमेला यश मिळाले व गेली कित्येक वर्षे लुप्त झालेला चोर दरवाजा सापडला. माती जाऊन हा चोर दरवाजा मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता. दुर्गरत्न प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आपल्या अथक परिश्रमाने दोन मोहिमांमध्ये हा चोर दरवाजा पूर्वीसारखा पूर्णपणे मोकळा केला. यामुळे तालुक्यातील नागरिकांसह तळगडावर येणाऱ्या पर्यटकांनाही हा शिवकालीन चोर दरवाजा पाहता येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.







