पेण शहरात मध्यरात्री सात ते आठ दुकाने चोरट्यांनी फोडली

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पेण शहर आणि परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून,गेल्या दोन दिवसात 11 डिसेंबरला पहाटेच्या दरम्यान तरणखोप गावात धाडसी चोरी करून चोरट्यानी जवळपास पाच लाखांचा माल लंपास केला.तर 12 डिसेंबरच्या रात्री शहरातील आठ दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत यामध्ये साधारणपणे 25 हजार रूपये चोरुन नेले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे शहरात चोरांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील तरणखोप गावातील व्यापारी रमेश गायकर हे आपल्या घरात झोपले असताना काही अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोर घरामध्ये घुसून तेरा तोळे सोने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम असे एकूण पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
ही चोरी होते ना होते तोच सलग दुसर्‍या दिवशी म्हणजे 12 डिसेंबरच्या रात्री पेण शहरातील जलाराम मेडिकल, चावडी नाका येथील आईस्क्रीम व मोबाईल शॉपी, हिमालया प्रॉडक्ट्स, भोईर यांचे फरसाण अँड स्वीट मार्ट, डोमोलोज केक शॉप, स्वरा लेडीज वेअर, चिंतामणी जनरल स्टोअर, रिंगरोड जनरल स्टोअर्स ही आठ दुकाने फोडून अंदाजे 20 ते 25 हजारांची रक्कम लंपास केली आहे.
दरम्यान सलग दोन दिवस झालेल्या या चोरीच्या घटनांनी पेणमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मात्र या सर्व दुकानांमधून चोरांनी फक्त पैसे घेतलेले सीसीटीव्हीत दिसत आहेत. मात्र एवढ्या घरफोडी झाल्यामुळे पेण शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सदर घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांबाबत गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेर्‍या फुटेजच्या आधारे अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.

Exit mobile version