| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरात चोरट्यांच्या टोळीने मोठे धाडस करुन पनवेल नगर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील जवळपास सात, तर शहरातील अन्य ठिकाणची पाच दुकाने फोडली. चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
पनवेल नगर शॉपिग कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापारी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून रात्री घरी गेले होते. मात्र, सकाळी दुकाने उघडण्यासाठी मालक आले असता, दुकानाचे शटर उचकटलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले. दुकानाचे शटर उचकटलेल्या अवस्थेमध्ये पाहून चोरी झाली असावी, असे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती दुकान मालकांनी पनवेल शहर पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा या कॉम्प्लेक्समधील जवळपास 12 दुकानांत ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पनवेल शहर पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. डॉग स्कॉडची मदत पोलिसांकडून घेतली जात आहे. एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. व्यापारीवर्गाकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
चोरट्याची संख्या किती?
पनवेल शहरातील नगरपालिका, शॉपिग कॉम्प्लेक्स आणि अन्य ठिकाणी चोरट्यांनी शटर उचकटून जवळपास 12 दुकाने फोडली आहेत. त्यामुळे चोरट्यांची संख्या किती असावी याबद्दल चर्चा सुरू आहे.