चोरट्यांनी फोडले एटीएम

दोन दिवस नेरळ शहरात लाईट नसल्याने चोरट्यानी घेतला फायदा 

| नेरळ | वार्ताहर |

अवकाळी पावसामुळे नेरळ शहरात गेली दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. याच अंधाराचा फायदा घेत येथील अज्ञात चोरट्यांनी आयसीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. या एटीएम मधून चोरट्यांना पैसे काही चोरता आलेले नाही परंतु, येथील मशीन चोरट्यांनी फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता.

कर्जत तालुक्याला मागील काही दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. त्यातच नेरळ शहरात या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी महावीतरणाचे विद्युत पोल कोसळून पडल्याने शहर दोन दिवस अंधारात आहे. बुधवारी (दि.15) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अंधारात नेरळ शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले सागर इलेट्रिकल स्टोर जवळील एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. अंधाराचा फायदा घेत हे एटीएम फोडल्याने येथील स्थानिकांना याची माहिती मिळाली नाही. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास येथील व्यापारी वर्ग दुकान उघडण्यासाठी आले असता ही माहिती मिळाली. याबाबत नेरळ पोलिसांना माहिती देताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांची पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

चोरट्यांनी स्क्रीन बाजूकडील एटीएम मशीन फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर ज्या मशीनच्या भागात पैसे ठेवले जातात तो भाग चोरट्यांना फोडण्यास जमलेले दिसत नव्हते. दरम्यान, या एटीएम मधून चोरट्यांना पैसे न घेताच खाली हात परतावे लागले. शहरात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने येथील बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरा हे देखील बंद झाले होते. त्यामुळे आता नेरळ पोलिसांसमोर चोरट्यांना शोधून काढणे हे एक मोठे आव्हान असणार आहे. घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलोस अधिकारी टीडी. टे. ळे. यांनी भेट दिली आहे तर अधिक तपास नेरळ पोलीस करीत आहेत.

नेरळ शहरातील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळे एकीकडे नागरिक हैराण झाले आहेत, त्यातच आता चोरीच्या घटना समोर आल्याने नागरिक भयभीत झालेत. अंधाराचा फायदा घेत कोण काय करेल याचा नेम नाही त्यामुळे एखादी मोठी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो. विद्युत महावितरण कंपनीकडे कर्मचाऱ्यांचा अभाव त्यातच नियोजन शून्य काम यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास भोगावा लागत आहे.

Exit mobile version