धामणपाडा गावात चोरांचा सुळसुळाट

ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण

| भाकरवड | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील शहाबाज पंचक्रोशीतील धामणपाडा या गावात गेल्या सहा – सात महिन्यात पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या असून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
   
प्रत्येक घरफोडीमध्ये चोरांनी घरात घुसून घरातील पैसे, मौल्यवान वस्तू, दागिने एवढेच नाही तर देव्हाऱ्यातील देवांच्या चांदीच्या मूर्ती सुद्धा चोरून नेल्या आहेत. यात घरांचे व घरातील वस्तुंचेही खूप नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. श्री. संतोष पाटील, श्री. प्रशांत म्हात्रे, श्रीम.शुभांगी धुमाळ, श्री.चंद्रकांत म्हात्रे या ग्रामस्थांच्या घरात अनुक्रमे दोन – तीन महिन्यांआड चोऱ्या करण्यात आल्या आहेत.

या सर्व चोरीप्रकरणा बद्दल ग्रामस्थ मंडळ धामणपाडा यांनी पोयनाड पोलीस ठाणे यांना रितसर अर्ज करून पोलिसांनी चोरांचा तपास करावा व त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु आजदेखत कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही त्यामुळे आधीच घाबरलेले ग्रामस्थ प्रशासनाच्या या असंवेदनशील व उदासीन कारभारामुळे संतप्त झाले आहेत. तरी पोयनाड पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री संतोष दराडे यांनी याकडे विशेष लक्ष वेधून ग्रामस्थांमध्ये जे भीतीचे वातावरण पसरले आहे त्याकरिता  सहकार्य करावे अशी विनंती यावेळी ग्रामस्थांनी केली आहे  

Exit mobile version