श्रीवर्धन शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच

सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात अडचणी

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील काही भागांमध्ये भुरट्या चोऱ्या होण्याच्या घटना वाढत आहेत. या बहुतांश चोऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांचा समावेश असल्याचे जवळजवळ उघड झाले आहे. शनिवारी रात्री बागमांडले येथील अल्ताफ कवारे यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. दुकानात शिरल्यानंतर त्याने सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरा काढला. परंतु दुकानात त्याला पैसे कोठे ठेवलेले आहेत हे सापडले नसल्याने त्याने त्या ठिकाणी असलेली अंडी व भाजीपाला याचा नाश करून त्या ठिकाणाहून पळ काढला.

रविवारी सकाळी अल्ताफ कवारे दुकानात गेले असता त्यांना आपल्या दुकानात चोर शिरलेला असल्याचे आढळून आले व त्या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा देखील गायब झाल्याचे लक्षात आले. सदरचा चोरटा दुकानात शिरल्यानंतर सीसीटीव्हीने अनेक वेळा त्यांच्या मोबाईलवर मेसेज देखील दिले. परंतु अल्ताफ कवारे हे झोपेत असल्यामुळे त्यांना ही गोष्ट लक्षात आली नाही. परंतु चोरी करणारा चोरटा अखेर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडलाच गेला. सदर चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेरा व त्या ठिकाणचा युनिट जवळच असलेल्या बाणकोट खाडीमधील खाजणात फेकुन दिल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदरचा कॅमेरा व सीसीटीव्ही युनिट ताब्यात घेतले व सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर चोरी करणारा तरुण हा बागमांडले गावातीलच असून 20 ते 22 वर्षे एवढ्याच वयाचा तो आहे. अशाच घटना श्रीवर्धन शहरात देखील घडू लागल्या आहेत. नितीन भगत या चालकाने जुन्या कस्टम ऑफिस जवळ आपला महिंद्रा मॅक्झिमो हा टेम्पो उभा करून ठेवलेला असताना, सदर टेम्पोची बॅटरी चोरट्याने रात्रीत गायब केल्याची घटना आठ दिवसापूर्वी घडली होती.

चोरी झालेले तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत नसल्याने पोलिसांसमोर देखील नक्की कोणाची चोरी झाली हे तपासण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ज्या नागरिकांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत त्यांनी तातडीने श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे संपर्क साधावा व तक्रार द्यावी जेणेकरून चोरांचा तपास घेणे श्रीवर्धन पोलिसांना सोपे जाईल. निसर्ग चक्रीवादळा अगोदर श्रीवर्धन शहरांमध्ये जवळजवळ 75 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते. प्रत्येक चौकामध्ये व समुद्रकिनाऱ्यावरती हे कॅमेरे बसवलेले असल्यामुळे प्रत्येक चौकातील कॅमेऱ्यामुळे त्या ठिकाणचा रस्ता किंवा पाखाडी कॅमेराच्यामध्ये कव्हर होत होती.

परंतु वादळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने व बरेचसे कॅमेरे फुटून गेल्याने अद्याप पर्यंत नगर परिषदेला कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने कॅमेरे बसवण्याचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे भुरट्या चोरांचे चांगलेच फावले असून रात्रीच्या वेळी अडीच ते पावणेतीन या दरम्यान हे चोऱ्या करताना आढळून येतात. अशा भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी श्रीवर्धन पोलिसांनी देखील रात्रीच्या वेळी श्रीवर्धन शहरात गस्तीमध्ये वाढ करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version