जागे कोण पोलीस की चोर; चोरांचे पोलिसांना आव्हान
|रायगड । प्रतिनिधी ।
तालुक्यातील पानपट्टी व्यावसायिकांवर सराईत चोरांनी आपली वक्रदृष्टी टाकली आहे. काळोखाचा फायदा घेत अज्ञात चोरांनी तालुक्यातील वायशेत खडताळ पूल, आरसीएफ काटा गेट आणि भाल नाक्यावर असणाऱ्या पानपट्टीमध्ये चोरी केली. पानपट्टी मधून चोरांनी धुम्रपानाचे साहित्य आणि रोख रक्कम चोरून नेल्याने पानपट्टी व्यावसायिक हतबल झाले आहेत. चोरांनी भाल नाक्यावर असणाऱ्या पानशॉप मध्ये चोरी करण्याची हॅट्ट्रिक .केली तालुक्यातील थळ परिसरात चार पानपट्टी फोडून चोरी केल्याने थेट पोलिसांना आव्हान दिले आहे. या वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या चोरीच्या घटनांमुळे रात्रीच्या अंधारात नक्की जागे कोण पोलीस की चोर असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
तालुक्यातील वायशेत येथील दिनेश पान शॉप आणि भाल फाट्यावरील बाळूमामा पान शॉप या दोन पानपट्टी चोरांनी फोडून चोरी केली आहे. यामधील भाल फाट्यावरील बाळूमामा पान शॉप ही पानपट्टी चोरांनी 19 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत एक ,दोन नव्हे तब्बल तीन वेळा ही पानपट्टी फोडली. पानपट्टी फोडून चोरांनी विविध कंपन्यांचे 85 हजार रुपयांची सिगारेट आणि दहा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. वायशेत येथील दिनेश पान शॉप ही पानपट्टी फोडण्याचा अज्ञात चोरांनी प्रयत्न केला. पानपट्टी फोडण्याचा आवाज आल्याने तेथील नागरिक जागे झाल्याने चोर पसार झाले.
खडताळ पुलानजीक असणारी पानपट्टी चोरांनी फोडली. या पान पट्टीमधून चोरांनी , 28 हजारांचे सिगारेट, आणि 3 हजार रोख रक्कम चोरून चोर पसार झाले. आरसीएफ कपनीच्य काटा गेट समोर असणारी दीपक पान शॉप ही पानपट्टी अज्ञात चोरांनी फोडली. या पानपट्टी मधून चांदीची गणेश मूर्ती, सुमारे 35 हजार रुपयांची सिगारेट, 8 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरांनी पलायन केले. याबाबत एका पानपट्टी व्यावसायिकाने अलिबाग पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या चोऱ्यांचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडे या चोरांची पादत्राणे तपासादरम्यान सापडली आहेत. अद्यापही पानपट्टी फोडून चोरी करणारे चोर पसार आहेत.या चोरांना बेड्या घालण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. बाळूमामा पान शॉप मष्ये चोरी झाल्याचा गुन्हा अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. परंतु अन्य तीन पानपट्टी मध्ये चोरी झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली नसल्याचे समजते. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पानपट्टी व्यावसायिकांना तपास करतो असे सांगून त्यांची बोळवण केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
