शिवसेनेतर्फे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड शहरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने अनियमितपणे वीज पुरवठा होत असून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन वीज पुरवठा तातडीने पुर्ववत सुरळित न झाल्यास वेळप्रसंगी याविरोधात जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या शहर शाखेतर्फे देण्यात आला असून शहर प्रमुख आदेश दांडेकर व नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी आपल्या सहका-यांसमवेत महावितरणच्या उपअभियंता यांना एक निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या महिनाभरापासून मुरूड शहरामध्ये वीज पुरवठा अनियमित होत असून दिवसातुन अनेकदा विज पुरवठा खंडित केला जात आहे तर गेली दहा दिवस रात्रदिवस अनियमित विद्युत पुरवठा होत आहे. सध्या परिस्थितीनुसार सर्वच कामे ही ऑनलाईन केली जात आहेत काही विदयार्थ्यांच्या उदा. डिप्लोमा व डिग्री तसेच स्पर्धा परीक्षा सारख्या ऑनलाईन परीक्षा अनेक विदयार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले गेले आहे.
मुरुड जंजिरा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे याठिकाणी लाखो पर्यटक येत असतात, त्यांच्यामुळे अनेक व्यवसायिकांचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून असून आपल्या विजेच्या अनियमितपणा मुळे पाणी प्रश्न व्यवसायिक छोटे स्टॉलधारक यांच्यावर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे मुरूड शहराला पाणीपुरवठा करताना आपल्या विजेच्या अनियमितपणा मुळे सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नागरीकाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कार्यकालाबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
अनियमित न वीज पुरवठ्यामुळे अनेक घरातील उपकरणे खराब झालेली आहेत.सध्याच्या उन्हाच्या काहीलीमुळे लहान मुले व जेष्ठ नागरीकांचे हाल होत आहेत. सध्या आपल्याकडे पावसाळी वातावरण नसून सुद्धा वीजेची गैरसोय होत आहे. तरी आपण या प्रकरणी लक्ष घालून आपणाकडे तज्ञ अभियांत्रिक नसल्यास मुख्य कार्यालयाकडून तज्ञ वर्ग बोलावून शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा.अन्यथा या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास वेळप्रसंगी याविरोधात जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील.असे निवेदनात म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती अलिबाग-मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी, मुरुड तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.