तळा शहरात पार्किंगचे तीनतेरा

। तळा । वार्ताहर ।
तळा शहरात पार्किंग व्यवस्थेची आवश्यकता भासत असून पार्किंगची व्यवस्था नसल्याने बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
तळा बाजारपेठ ही लहान स्वरूपाची असून बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले ग्राहक शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने आपली दुचाकी व चारचाकी वाहने बाजारपेठ परिसरात कोठेही पार्क करून ठेवतात. यामुळे समोरासमोर दोन एसटी बसेस किंवा ट्रक, टेम्पो आल्यास बेशिस्त पार्किंगमुळे तसेच अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. ही वाहतूककोंडी सुटताना बराचसा वेळ वाया जातो. काही वेळा बराच वेळ होऊनही ही वाहतूक कोंडी सुटत नाही. त्यामुळे महत्वाच्या कामासाठी निघालेल्या नागरिकांना आपल्या इच्छितस्थळी वेळेवर पोहचता येत नाही. तसेच शहरातील बळीचा नाका परिसर, बसस्थानक परिसर, मिनिडोअर स्टँड च्या समोर तसेच नगरपंचायतीसमोर दुचाकी व चारचाकी खाजगी वाहने अवैधरित्या पार्किंग केलेल्या असतात.त्यामुळे शहरात पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटेल अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version