। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्याचे व्हिडिओ बनवून ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी 17 वर्षांचे असून, त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलांपैकी एकाने पीडित मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख वाढवली. काही दिवसांच्या संभाषणातच त्यांची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर, आरोपीने मुलीला भेटण्यास बोलावले. पीडित मुलगी आरोपीला भेटण्यास गेली असता, त्याने धमकावून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान आरोपीने संबंधाचे व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. दुसऱ्या आरोपीने देखील इन्स्टाग्रामवरूनच मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर तिला भेटण्यासाठी एका पडीक बंगल्यात बोलावले. पीडिता भेटण्यास गेली असता, त्याने तिला पहिल्या आरोपीकडे असलेले व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यानेही तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
ही घटना 1 जून ते 5 जून 2025 दरम्यान घडली. दोन्ही आरोपी पीडितेला त्रास देऊ लागले. मानसिक छळ असह्य झाल्याने अखेर पीडित मुलीने आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबाबत सांगितल्यावर ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दोन अल्पवयीन मुलांकडून तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार
