श्रीवर्धनमध्ये प्लास्टिकबंदीचे तीनतेरा

पिशव्यांचा सर्रास वापर, प्रशासनाचे दुर्लक्ष
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यासह संपूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर होत असताना, तालुका प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाचे प्लास्टिकबंदीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी प्लास्टिकबंदी जाहीर झाल्यानंतर दुकानदारांकडून प्लास्टिक जप्त केले जात होते. प्लास्टिक ज्या ठिकाणी स्टॉक करून ठेवले होते, अशा ठिकाणी धाडी टाकून दंडात्मक कारवाईदेखील सुरू झाली होती. यावेळी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद झाला होता. परंतु, काही दिवसांनंतर प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिल्यानंतर नागरिकांनी कापडी पिशव्या आणणे बंद केले आहे. त्यामुळे सर्रासपणे सर्व व्यापारी दुकानात येणार्‍या गिर्‍हाईकांना प्लॅस्टिक पिशव्या देताना पाहायला मिळतात.

आराठी ग्रामपंचायत हद्दीत गोखले महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कचर्‍यात फेकलेल्या प्लास्टिकचा खच पडलेला आहे. मात्र, याबाबत आराठी ग्रामपंचायत किंवा श्रीवर्धन पंचायत समितीकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. प्लास्टिक पिशव्यांमुळे अनेकदा गटारे तुंबतात व पावसाळ्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. शासनाने बंदी जाहीर करूनसुद्धा केवळ प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू आहे. तरी श्रीवर्धन तालुका प्रशासन व श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाने प्लास्टिक पिशव्यांवरती बंदी तातडीने लागू करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

Exit mobile version