नशेली, रेव्ह पार्ट्यांची डोकेदुखी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
थर्टी फर्स्ट निमित्ताने येथील पर्यटक व्यावसायिक जय्यत तयारी करीत असताना ड्रग्स तस्करही आपले जाळे विस्तारीत आहेत. कर्जत, लोणावला पर्यंत मर्यादीत असलेला पर्यटनच्या नावाखालील अंमली पदार्थ्यांचा व्यापार आता रेवदंडा, किहीम, कोलाड परिसर, श्रीवर्धन या ठिकाणीही पसरत असल्याच्या शक्यतेने रायगड पोलिसांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने 22 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्स तस्कर नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्ताने रायगड जिल्ह्यात होणार्या पार्ट्यांसाठी ड्रग्सची सप्लाय करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे रायगड पोलिसांना पंधरा दिवसांपुर्वीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
रायगडचे अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यातच अंमली पदार्थ विरोधी समीतीची बैठक पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. या समीतीच्या बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभाग, जेएनपीटी, सीमा शुल्क विभाग, अन्न आणि औषध प्रशासन, भारतीय तटरक्षक दल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अनेक गंभीर बाबींवर चर्चा करण्यात आली. यात ड्रग्सची पुरवठा साखळी कशा प्रकारे तोडता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुढील काही दिवसात जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, पार्ट्यांचे आयोजक, पर्यटक वाहतुक व्यावसायिक, स्थानिक पोलिस पाटील यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. यातून संशयीत व्यक्तींवर नजर कशाप्रकारे ठेवावी याची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर थर्टीफस्टच्या निमित्ताने आयोजीत होणार्या पार्ट्यांची माहिती, त्यांच्या आयोजकांची माहिती, किती व्यक्ती उपस्थित राहणार यांची माहिती गृहविभागाला द्यावी लागणार आहे.
बदनाम फार्महाऊस
आडमार्गाला असलेले कर्जत, खालापूर तालुक्यातील फार्महाऊस हे रेव्ह पार्ट्यांसाठी बदनाम झाले आहेत. या ठिकाणी आतापर्यंत अनेक रेव्हपार्ट्यांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाया केलेल्या आहेत; परंतु मुंबई, पुण्यापासून जवळच असल्याने येथे थर्टीफस्ट निमित्ताने पार्ट्या करणार्यांसाठी येणार्यांची संख्या कमी होत नाही. विशेषत: रेव्ह पार्ट्यांसाठी आता कोलाड, रेवदंडा, किहीम, दिवेआगर येथील नवनव्या फार्महाऊस पर्यंत या या व्यवसायाचा विस्तार झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक करु लागले आहेत.
पोलिसांची वाढली डोकेदुखी
कोरोनानंतर सर्व उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरे होत असल्याने थर्टीफस्टच्या आयोजनावर अद्याप कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. थर्टीफस्टच्या दोन दिवसांपुर्वीच पर्यटक येण्यास सुरुवात होईल. यात मद्याची बेकायदेशीर वाहतुक रोखण्यासाठी पोलिसांना नाकाबंदी करावी लागणार आहे, त्याबरोबरच अन्य कारणासाठीही पोलीसांना आपली ताकद लावावी लागणार आहे. पोलीसांच्या विशेष शाखेच्या माहितीनुसार थर्टीफस्ट निमित्ताने रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता असून या दरम्यान अन्य गुन्ह्यांचीही संख्या वाढू शकते. त्यामुळे रायगड पोलीसांची डोकेदुखी वाढणार आहे.