। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत. सदस्य मंडळाची मुदत संपल्याने त्या सर्व ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सार्वत्रिक निवडणुकीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. फेब्रुवारी 2024 पासून तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य मंडळ यांच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या तब्बल 30 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
तालुक्यात 55 ग्रामपंचायतीपैकी 2024 मध्ये पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत 20 ग्रामपंचायतींच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे. त्यानंतर 10 डिसेंबर 2024 पर्यंत तालुक्यातील आणखी 10 ग्रामपंचायतींच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे सध्या कर्जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींमध्ये सदस्य मंडळ अस्तित्वात नाही. कर्जत तालुक्यातील कशेळे, मोग्रज, माणगाव तर्फे वरेडी, सावेळे, वारे, किरवली, बोरिवली, शेलू, पाषाणे, मानिवली, हालिवली, आसल, खांडपे, शिरसे, ममदापुर, पळसदरी, सावळा हेदवली, पिंपळोली, बीड बुद्रुक, अंजप, रजपे, जामरुंग, चिंचवली, नेरळ, वदप, वरई तर्फे नीड, तिवरे, वाकस, उमरोली अशा एकूण 30 ग्रामपंचायतींमध्ये देखील सदस्य मंडळ अस्तित्वात नाही.
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी मतदार याद्या प्रसिद्ध करून अंतिम करण्यात आल्या आहेत. 19 मार्च रोजी मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्या 24 मार्च रोजी अंतिम करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोग यांच्या माध्यमातून सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशाच मतदार याद्या जाहीर करण्याचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक प्रशासनाने यापूर्वी दोनवेळा जाहीर केला होता. फेब्रुवारी आणि जुलै 2024 मध्ये देखील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका घेण्यासाठी मतदार याद्या अद्ययावत केल्या होत्या. मात्र, आता ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी पुरेसा कालावधी राज्य निवडणूक आयोगाकडे असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल महिन्यापासून निवडणुकीसाठी मतदानकेंद्र उभारले जात असलेले शाळा उपलब्ध होणार आहेत.
पोटनिवडणूक
हुमगाव ग्रामपंचायत 1 जागा
अंभेरपाडा ग्रामपंचायत 1जागा
कोल्हारे ग्रामपंचायत 1 जागा
गौरकामत ग्रामपंचायत 1 जागा
पाली ग्रामपंचायत 3 जागा