टोरंटसाठी राखीव, संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड; दररोज 500 झाडांचा बळी; स्थानिकांमधून संताप व्यक्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटीमध्ये सायडोंगर येथे टोरंट हायड्रॉलिक वीज प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सरकारने 640 एकर वन जमीन दिली असून, त्या जमिनीवरील हजारो झाडे तोडली जाणार आहेत. ही झाडे तोडण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागणार असून, पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मोखाडा तालुक्यातील लाकूडतोड्यांकडून ही झाडे तोडली जात आहेत. विशेष म्हणजे वन विभागाचा संवेदनशील आणि संरक्षित वन क्षेत्र असलेल्या भागातच वन विभागाने झाडे तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराबद्दल स्थानिकांसह जिल्ह्याभरातून संताप व्यक्त होत आहे.
पाली तर्फे कोतवाल खलाटी येथील सायडोंगर भागात टोरंट हायड्रॉलिक प्रकल्पासाठी वन विभागाने येथील राखीव वन सर्व्हे नंबर 28,29 मधील 640 एकर जमीन दिली आहे. या जमिनीवर असलेली 32,480 झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. ती झाडे तोडण्याचा ठेका पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मोखाडा या तालुक्यातील झाडे कापणाऱ्यांना देण्यात आला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सायडोंगर भागातील राखीव वन भागातील संवेदनशील क्षेत्रातील झाडे कापण्यास सुरुवात केली असून, दररोज येथील 500 च्या आसपास झाडे कापली जात आहे. दरम्यान, या झाडे कापण्याच्या मोहिमेला स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जी जमिन वन विभागाने टोरंट प्रकल्पाला दिली आहे ती जमीन संवेदनशील वन क्षेत्र आहे. त्याच भागात जंगलतोड होत असल्याने वन विभागाच्या प्रत्यक्ष आदेशाला बासनात गुंडाळून ठेवण्याचा प्रकार तेथे सायडोंगर भागात सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच, सायडोंगर भागात वन विभागाने ‘सायडोंगर परिसर राखीव आणि संवेदनशील वन असल्याचे तसेच कोणत्याही व्यक्तीने प्रवेश करू नये,’ असे फलक लावले आहेत. असे असतानाही कर्जतच्या वन विभागाकडून जंगलतोड करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वन विभाग स्थानिकांची फसवणूक करीत असल्याचे कर्जत पर्यावरण बचाव समितीकडून आरोप होत आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील टोरंट धरणासाठी हजारो झाडे तोडली जात आहेत. त्या झाडांना चिपको आंदोलन करण्याचा निर्णय कर्जत पर्यावरण बचाव समितीने केला आहे. त्या आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदे हे देखल सहभागी होणार आहेत.
झाडे कापणाऱ्यांना पळवून लावले
सायडोंगर जंगलातील 32 हजार झाडे तोडण्यासाठी तेथे आलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मोखाडा तालुक्यातील लोकांना स्थानिकांमधून तिव्र विरोध करण्यात आला. झाडे तोडण्यास प्रचंड विरोध होत असल्याने ठेकेदार कंपनीने त्यांना पळून लावले आहे. त्यामुळे सध्यातरी सायडोंगर जंगलात कोणीही झाडे तोडणारे दिसत नाहीत.
गुजरातच्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेसुमार कत्तल राजरोसपणे सुरू आहे. सायडोंगर परिसरातील समृद्ध निसर्ग संपवून, स्थानिकांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला पायदळी तुडवून ही कत्तल कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? स्थानिकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तीव्र विरोध असताना ह्या बेसुमार वृक्षतोडीची परवानगी वन विभागाने नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली? महाराष्ट्राचा निसर्ग ओरबाडून खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा अजेंडा कधी थांबणार? नोव्हेंबरला होणाऱ्या भूमिपूजनाच्या घाईकरिता, महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जात आहे? एक तर 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे आणि त्यात जंगल कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न भाजप राजवटीने हाती घेतला आहे.
आदित्य ठाकरे,
माजी पर्यावरण मंत्री







