दादाचे नाही, आमदाराचेच हे पाप! 35 कोटींच्या पाणी योजनेत भ्रष्टाचार

कामाआधीच 14.74 कोटींचे देयक

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

चौल ते वायशेत-शास्त्रीनगर या कोट्यवधी रुपयांच्या जलजीवन योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना कोट्यवधी रुपयांचे खोटे बिल काढण्याचा प्रताप आमदार महेंद्र दळवी यांचा ठेकेदार असलेल्या एव्हिएन आयईएल इन्फ्रास्ट्रक्चरकडून करण्यात आले आहे. ही बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाल्याने मतांसाठी सुरेंद्र म्हात्रे यांच्यावर आरोप करणाऱ्या आमदारांची बोलती बंद झाली आहे. चौल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सचिन राऊळ यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत आमदारांनी चौल पाणी योजनेचा मुद्दा घेत महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांच्यावर जवळपास 3 कोटी रुपयांची खोटी बिले काढल्याचा आरोप केला होता. मात्र, माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीने आमदारांचे पाप उघड झाले आहे.

चौल जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांना याबाबत विचारणा केली असता मतदारांची दिशाभूल करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेत मी घोटाळा केल्याचा आरोप आमदारांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच दळवी दोन टर्म आमदार आहेत, तर ते चौकशी करु शकले असते. परंतु, चौल ते वायशेत जलजीवन योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असून, जवळपास 35 कोटींचे काम असणारी ही योजना पूर्ण होण्याआधीच 14 कोटी ठेकेदाराला देण्यात आले आहेत. अद्याप याठिकाणी कोणतेच काम केलेले नाही. स्वतःचे पाप झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करायची सवय असणाऱ्या आमदारांचे पितळ उघड पडल्याचे सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगत आ. दळवींवर जोरदार हल्लाबोल केला.

चौल, वायशेत, शास्त्रीनगर, रेवदंडा याठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचे अंदाजपत्रक 35,49,09,464 रुपयांचे आहे. कामाची सुरुवात 30 एप्रिल 2023 रोजी झाली. अधिकृत नोंदीनुसार कामाची नियोजित पूर्णता 29 जानेवारी 2025 अशी आहे. मात्र, पूर्णत्व प्रमाणपत्र 27 मार्च 2024 रोजीच देण्यात आले आहे. म्हणजे, नियोजित मुदतीच्या जवळपास दहा महिने आधीच प्रमाणपत्र कसे देण्यात आले? याच काळात, कामाचा अंशतः हिशोब बिलनुसार 14,74,55,954.99 इतकी रक्कम देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काम पूर्ण होण्याआधीच खोटी बिले काढण्याचा उद्योग आमदारांच्या ठेकेदाराकडून करण्यात आल्याचे सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.

दरम्यान, कागदोपत्री हजारो मीटर डक्टाइल आयर्न पाईप, जोडसामुग्री, साठवण टाक्या आणि वितरण व्यवस्था उभारल्याचे नमूद आहे. हे काम एव्हिएन आयईएल इन्फ्रास्ट्रक्चर संयुक्त उपक्रम या ठेकेदाराकडे आहे. हा ठेकेदार आमदार महेंद्र दळवी यांचा माणूस असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ठेकेदाराला हाताशी धरुन खोटा पैसा लाटण्याचे काम याठिकाणी झाले असल्याचा आरोप सुरेंद्र म्हात्रे यांनी केला आहे.

चौल ते वायशेत हद्दीत कोणतीही पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. साठवण टाक्या उभारण्यात आलेल्या दिसत नाहीत, वितरण व्यवस्था उभारलेली नाही. तरी ही मोजमाप पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर काम पूर्ण दाखवून त्यावर आधारित देयके अदा झाली आहेत. पूर्णत्व प्रमाणपत्रात “काम पूर्ण व जागा स्वच्छ” असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नसताना 14 कोटी कोणत्या कामाचे काढण्यात आले, याचे उत्तर आमदारांनी द्यावे, असे ही सुरेंद्र म्हात्रे यांनी ठणकावले.

अपूर्ण कामाला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र
जलजीवन मिशनच्या अटींनुसार प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतरच देयक आणि प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. मात्र, हे काम अपूर्ण असतानाही कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आले आहे. माहितीच्या अधिकारातील माहितीनूसार, ग्रामपंचायत पडताळणी, प्रत्यक्ष जागेची पाहणी, घरोघरो नळजोडणी याबाबत स्पष्ट नोंदी उपलब्ध नसल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर आमदारांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. आपलं ठेवायचे झाकून, आणि… या सवय असणाऱ्या आमदारांनी सुरेंद्र म्हात्रे यांच्यावर केलेला आरोप माहितीच्या अधिकारामुळे त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र दिसून येत आहे.
आमदारांना थेट सवाल
काम अपूर्ण असताना पूर्णत्व प्रमाणपत्र कसे?
14.74 कोटींचे देयक कोणत्या प्रत्यक्ष मोजमापावर?
साइट पाहणीची नोंद कुठे?
ग्रामपंचायत पडताळणी झाली का?
नियोजित मुदतीपूर्वी काम पूर्ण दाखविण्याची घाई का?
माहिती अधिकारातून माहिती उघड
माहिती अधिकारातून समोर आलेल्या नोंदींमुळे या योजनेतील विसंगती उघड झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची प्रत्यक्ष मोजणी, स्वतंत्र आर्थिक लेखापरीक्षण आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
आमदार साहेब, पाईप, टाक्या आहेत कुठे?
चौल-वायशेत परिसरात प्रत्यक्ष फिरुन पाहिल्यास वेगळेच वास्तव समोर येत आहे. इथे पाईप टाकले म्हणे.. पण, जमिनीत खड्डाही खोदलेला नाही. ज्या ठिकाणी टाक्या उभारल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आलेय, त्या जागा मोकळ्या आहेत. मग, पाईप, टाक्या गेल्या कुठे? हे आमदार साहेबांनीच सांगावे, असेही सुरेंद्र म्हात्रे म्हणाले.

माझ्यावर पाणीपुरवठा योजनेत घोटाळा केल्याचा आरोप आमदार करीत आहेत, त्या योजनेशी माझा काहीएक संबंध नाही. ही योजना यांचीच असून, ठेकेदारही आमदारांचाच आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप माझ्यावर करण्यात येत आहेत. आपण आमदार आहात, मग चौकशी लावून सत्य बाहेर का काढले नाही. मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, येथील मतदार सुज्ञ असून, असल्या खोट्या आरोपांना बळी पडणार नाही. तसेच चौल ते वायशेत या योजनेचे कोणतेही काम झालेले नसताना काम पूर्ण झाल्याचे दाखवून काढण्यात आलेल्या खोट्या बिलांची चौकशी झालीच पाहिजे.

सुरेंद्र म्हात्रे

Exit mobile version