। जयपूर । वृत्तसंस्था ।
झपाट्याने पसरणार्या करोनाच्या ओमीक्रॉन या प्रकाराचा भारतात पहिला बळी गेला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दिली. मृत 72 वर्षीय रुग्ण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह निघाला होता, त्यानंतर त्याची चाचणी निगेटिव्ह आली. परंतु स्वास्थासंबंधीत गुंतागुंतीमुळे तो रुग्णालयात दाखल होता. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की हा मृत्यू ओमीक्रॉनचाच मानला जाईल. कारण तो ओमीक्रॉनची लागण झाल्यापासून रुग्णालयात दाखल होता.
देशात ओमीक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील ओमीक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 2,135 झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 653 आणि दिल्लीत 464 रुग्ण आढळले आहेत. ओमीक्रॉनवरील 2,135 रुग्णांपैकी 828 बरे झाले आहेत.
भारतातील करोना रुग्ण संख्येने आता वेग पकडला आहे. गेल्या 24 तासांत देशात करोनाचे 58 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात करोनाच्या 58 हजार 97 नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आला आहे. त्याच वेळी, या कालावधीत केवळ 15 हजार 389 करोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे.