केतनची ‘ही’ गोष्ट खटकली…; सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यातील प्रसिद्ध तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्याची हत्या केली. लोहगडावरून त्याला 400 फूट खोल दरीत ढकलून दिले आणि केतन अग्रवालची हत्या ही अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या खळबळजनक माहितीनुसार, आरोपी सिया गोयल हिला केतनसोबत लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. केतन बोलताना अडखळायचा ते सियाला प्रचंड खटकले होते. तिला त्यावरून तक्रार होती, त्याच्या आणखी काही गोष्टी तिला आवडत नव्हत्या. केतनला टक्कल होते आणि तो डोक्यावर केसांचा विग वापरायचा, ही गोष्ट सियाला प्रचंड खटकत होती. याच कारणावरून तिच्या मनात केतनबद्दल कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. शेवटी तिने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. या आधी दोन वेळा केतन याला मारण्याचा प्रयत्न सिया हिच्याकडून करण्यात आला. मात्र, तिला यश मिळाले नाही.

केतनच्या हत्येचा कट त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ एका कारणावरून रचला गेला. हे कारण ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. केतन अग्रवालची हत्या ही अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, केतनच्या कुटुंबाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली. तपासाअंती ही हत्या असल्याचे समोर आले.

केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती, ही गोष्ट सियाला माहीत होती. याच आवडीचा फायदा घेऊन त्याला संपवण्याचा प्लॅन आखण्यात आला. केतनला ट्रेकिंगच्या बहाण्याने एखाद्या किल्ल्यावर न्यायचे आणि तिथून खोल दरीत ढकलून देऊन तो एक अपघात असल्याचा बनाव करायचा, असा क्रूर कट या दोघांनी रचला. यासाठी त्यांनी लोहगड किल्ल्याची निवड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिया आणि चेतनने या प्लॅनसाठी चक्क तीन वेळा लोहगड किल्ल्यावर जाऊन ‘रेकी’केली होती. किल्ल्यावर नेमकी कोणत्या ठिकाणी खोल दरी आहे? आणि कुठून ढकलल्यास तो निव्वळ अपघात वाटेल? याची त्यांनी पद्धतशीरपणे पाहणी केली होती, असा दावा पोलिसांनी केला आहे. गुन्हा उघडकीस आल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक केली आहे. केतनच्या विगवरून सुरू झालेला हा वाद थेट दरीत ढकलण्याच्या क्रूर कटापर्यंत कसा पोहोचला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version