यंदा मान्सून दोन दिवस आधीच दाखल होणार
| पुणे | प्रतिनिधी |
तो येणार, तो बसरणार, तो आनंद घेऊन येणार.. हो, मान्सून यंदा वेळेआधीच येणार, असा त्याचा सांगावा आला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला आणि पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आभाळाकडे नजरा लागलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. दरवर्षी साधारण (दि.21) मे रोजीच्या आसपास मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. मात्र, यंदा तो दोन दिवस आधीच म्हणजे (दि.19) मे रोजीच दाखल होणार असून, देशात सरासरीपेक्षा जास्त पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.
दरवर्षी साधरण मान्सूनचा (दि.21) मे रोजीच्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो. यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. परिणामी, मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण (दि.1) जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर, महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन (दि.8) जूनच्या आसपास होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी राज्यात मान्सूनला येण्यास विलंब झाला होते. गेल्या वर्षी (दि.16) जूनला मान्सून राज्यात दाखल होता. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. एप्रिल महिन्यापासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. देशात अनेक ठिकाणी तापमानाने उच्चांक गाठला आहे. तर महाराष्ट्रासह कोकणाच्या परिसरात उकाडा असह्य होत आहे. त्यातच आता हवामान खात्याने मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिले आहेत. तसेच यावर्षी पर्जन्यमान सरासरीएवढे असेल, असाही अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. तसेच आता नागरिकांनाही उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांचा जीवलग शेतकऱ्यांचा जीवलग मान्सून येत्या (दि.8) जूनला संपूर्ण महाराष्ट्र दाखल होईल असा अंदाज आहे. मान्सूननं वर्दी दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. महाराष्ट्रात तर जून ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे हे भाकीत तंतोतंत खरं होऊ दे आणि शेतकऱ्यासह सगळ्यांनाच स्थैर्य लाभू दे अशीच अपेक्षा.
असा असेल मान्सूनचा प्रवास केरळमध्ये (दि.1) जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकतो. (दि.15) जुलैदरम्यान तो संपूर्ण देशभरात पोहोचतो. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून (दि.19) मे रोजी दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल. हवामान खात्याने मान्सून अंदामानात कधी दाखल होणार याचा अंदाज वर्तवला असला तरी मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर साधारण आठवडाभर ते 12 दिवसांत तो केरळमध्ये येतो.