यंदा हापूस हंगाम 70 दिवसांचा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
निसर्गातील सातत्याने होणारे बदल कोकणच्या प्रस्थापित अर्थकारणांवर आणि संबंधित घटकांवर लक्षणीय परिणाम करत आहे. याच पार्श्‍वभूमीवर डिसेंबर महिन्यातील पावसाळी वातावरणामुळे यंदाचा हापूस हंगाम 70 दिवसांचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मात्र, यामुळे बागायतदारांची अडचण झालेली आहे. पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर गळून गेला असून, त्यामधून मिळणार्‍या उत्पन्नाला बागायतदारांना मुकावे लागले आहे. ती झाडे पुन्हा जानेवारीत महिन्यात फुटतील. कल्टारचा वापर होत असल्यामुळे अनेक ठिकाणी बागा लवकर मोहोरत असल्याचे दिसते. सध्या थंडीला विलंब झाला असून, किमान तापमान मोहोर फुटीला आवश्यक एवढे नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 10 डिसेंबरपासून पुढे थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.
थंडीचा जोर फेब्रुवारीपर्यंतच राहील. जानेवारी महिन्यात येणार्‍या मोहोराचा एप्रिलच्या मध्यात फळ येईल. जिथे रोपदळ कलमे आहेत, त्यांना फूट चांगली असेल, पण मोठ्या झाडांना पाहिजे तशी फूट येणार नाही. पुनरुज्जीवन केलेल्या बागांमधून उत्पादन अधिक राहणार असल्याचे बागायतदारांचे मत आहे. पावसाळा लांबल्यामुळे हापूसला मोहोर येण्यासाठी विलंब झाला होता; मात्र समुद्र किनारी भागातील हापूसच्या बागांमध्ये मोहोर आला आहे. त्यात राजापूर, देवगड, गणपतीपुळे, मालगुंडसह पुढे किनार्‍यांवर मोहोर आलेल्या बागांची संख्या सर्वाधिक आहे. आंबा हंगाम हा सर्वसाधारण 100 ते 110 दिवसांचा असतो. उशिरा मोहोर आल्यामुळे यंदा सुरुवातीच्या म्हणजेच महिन्यातील तीस दिवसांची स्थिती सामान्य राहील. पुढे शेवटच्या टप्प्यात बंपर पीक हाती येईल. त्यामुळे फळ मार्केटमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील काही कोटींच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे.

Exit mobile version