यंदा फळांचा राजा आंबा खातोय भाव

सर्वसामान्यांसाठी हापूस आंबट
700 ते 800 रुपये डझन
अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान
उत्पादन व आवक कमी, खवय्ये व पर्यटकांचा हिरमोड

| धम्मशील सावंत | पाली/बेणसे |

सातत्याने येणार्‍या वादळात आंब्याच्या झाडांची झालेली पडझड, खराब हवामान व गारपीट यामुळे हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. याबरोबरच चक्रीवादळाने झालेले नुकसान, मोहोर गळती, कमी आवक यामुळे यंदा हापूस आंब्याच्या किंमती 700 ते 800 रुपये डझनवर गेल्या आहेत. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड होऊन बसले आहे. फळांचा राजा भलताच भाव खात असल्याने खवय्ये व पर्यटक हिरमुसले आहेत. तर, उत्पादन घटल्याने आंबा बागायतदारदेखील चिंतातुर असून, सरकारकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत.


गेल्यावर्षी मे महिन्यात 300 ते 400 रुपये डझनने हापूस आंबे मिळत होते. मात्र, सलग आलेल्या चक्रीवादळामुळे आंब्याची हजारो झाडे उन्मळून पडली. तसेच अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे यंदा जिल्ह्यातील आंब्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आंब्याच्या उत्पादनात सुमारे 70 ते 80 टक्के घट झाली आहे. त्यामुळे हापूस आंब्याची खूप कमतरता आहे. रत्नागिरी व देवगडचा हापूसदेखील थेट वाशी मार्केटला व मोठ्या बाजारात जात आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात हापूस कमी दिसत आहे. अनेक आदिवासी जंगलात किंवा परसबागेत लावलेल्या आंब्याच्या झाडावरील आंबे बाजारात टोपल्यांमध्ये घेऊन विक्रीसाठी येत असतात. विविध फार्म हाऊसच्या बागांमधील आंबे देखील विक्रीसाठी येतात. पण, यंदा तेही आले नाहीत. या जोडीलाच कर्नाटकी, पायरी, तोतापुरी, नीलम, गावठी (बिटके) छोटे आंबे आदी विविध प्रजातींचे आंबेदेखील बाजारात ज्या प्रमाणात आले पाहिजे, तेदेखील उपलब्ध नाहीत. आंबा पिकाचे घटते उत्पादन चिंताजनक असून आंब्याच्या असंख्य प्रजाती टिकवने आता मोठे आव्हान झाले आहे. बदलते हवामानाचा गंभीर परिणाम आंबा उत्पादनावर होत असल्याने केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पाउले उचलून शेतकरी व बाग़ायत दार यांना भक्कमपने उभे राहण्यासाठी आर्थिक भरीव मदत व सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त होतेय.


यावेळी बोलताना आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले की, यावर्षी हवामान बदल होत प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. संपूर्ण कोकणात 2 डिसेंबर रोजीच्या पावसाने आंबा बागायतदार यांचे कंबरडे मोडले. 30 तास सलग पाऊस व हवा यामुळे आंबा मोहोर गळून पडला, तसेच पाण्याची पातळी वाढल्याने आंबा मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावली. डिसेंबर महिना आंबा बागायतदार यांच्यासाठी निराशाजनक गेला. अगोदर जो मोहोर आला तो बुरशी व बुरशीजन्य रोगांनी नुकसान झाले. जानेवारीमध्ये आलेला मोहोराने अगोदरचे आंबे पाडून टाकले. आंबा काढण्याचा सिजन जूनपर्यंत चालेल व जूनमध्ये पाऊस पडला, तर आंबा पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. फवारणी व इतर खर्च वाढला आहे. हा परवडणारा नाही. सरकारने शेतकर्‍यांचा सहानुभूतीने विचार करावा.

शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी
रायगड जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये आंबा बागांचे क्षेत्र 14 हजार हेक्टर इतके आहे. उत्पादनक्षम आंबा बागा या 12540 हेक्टर क्षेत्रावर आहेत. मागील दोन वर्षात निसर्ग व तौक्ते चक्री वादळाने फळ बागा व आंबा बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळाने जवळपास 8000 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर, तौक्ते चक्रीवादळाने जवळपास 1100 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफचे नॉर्मनुसार शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. कृषी विभागामार्फत ज्या फळ बागा क्षेत्रांचे नुकसान झाले, त्या क्षेत्रात फळबाग पुनर्लागवड व पुनर्जीवित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आजतागायत 4123 शेतकर्‍यांना 13 कोटी रक्कम वितरित केलेली आहे. अजूनही 22364 शेतकर्‍यांना जवळपास 27 कोटींचा निधी वितरित करणार आहोत. सदर निधी मंजुरीकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच हा निधीदेखील वितरीत केला जाईल. फळबागांचे मागील दोन वर्षांपासून होणार्‍या नुकसानीतून सावरण्यासाठी कृषी विभाग शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. शेतकर्‍यांनी या परिस्थितीत डगमगू नये शासन व कृषी विभाग आपल्या पाठीशी उभा आहे, असे आश्‍वासन दत्तात्रेय काळभोर, उपसंचालक कृषी विभाग अलिबाग रायगड, प्रभारी कृषी अधीक्षक, रायगड यांनी दिले आहे.

यंदा हापूस आंब्याची आवक खूप कमी आहे. उत्पादन घटले आहे. त्यामुळे घाऊक बाजारातदेखील माल उपलब्ध नाही. मागील वर्षी किंमती तुलनेने कमी होत्या. मात्र, यंदा त्या खूप वाढल्या आहेत.

नवीद मोमीन, फळविक्रेते, बेणसे

यंदा उत्पादन कमी असल्याने हापूसच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यात बाजारात हापूस उपलब्धदेखील नाही. त्यामुळे यंदा हापूसच्या चव चाखता येणार नाही असे वाटते.

प्रणाम सावंत, हापूस खवय्ये
Exit mobile version