। सुकेळी । वार्ताहर ।
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तसेच कोकणवासीयांचा सर्वात महत्वाचा असा सण मानला जाणाऱ्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. तरी अद्यापही काही केल्या मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न काही केल्या दूर झालेले नाही. कारण मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी महामार्गावर पाणी साचल्यामुळे तळावाचे स्वरुप आले आहे. अनेक राजकीय नेते गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरण्यासाठी गाजावाजा करत असतात. परंतु, त्याचा काहीही उपयोग होतांना दिसून येत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याबद्दल गणेशोत्सव जवळ आला की अनेक नेते पुढाकार घेत असतात. पंरतु, दरवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील गणेशोत्सवासाठी गावाला जाणाऱ्या कोकणवासीयांना खड्ड्यांतुनच प्रवास करावा लागणार आहे. त्यातच प्रवास करताना वाहतूक कोंडीचे विघ्नदेखील येणार आहेत. त्यामुळे काही महामार्गावरील खड्डे हे चाकरमान्यांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत.
दरम्यान, नागोठणे ते कोलाडपर्यंत प्रवास करताना गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरवर्षीप्रमाणेच खड्ड्यांमधील कसरतीचा प्रवास हा गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोकणवासीयांचा चुकलेला नाही. खरं तर यावर्षी प्रत्येक कोकणवासीय गणेशोत्सवासाठी गावाला गेल्यानंतर गणपती बाप्पाच्या चरणी एकच साकडं घालणार आहे की, सरकारला जाग येऊ देत व लवकरात लवकर मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ दे.







