थॉमस-उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा

भारतीय महिलांची स्पेनवर सरशी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

अनुभवी सायना नेहवालला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यानंतरही युवा खेळाडूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीच्या लढतीत स्पेनवर 3-2 अशी मात केली.
2012च्या लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाने स्पेनच्या क्लारा अझूरमेंडीविरुद्धच्या सामन्यातील पहिला गेम 20-22 असा गमावला होता. त्यानंतर तिला दुखापतीमुळे सामन्यात पुढे खेळता आले नाही. मात्र, दुसर्‍याच लढतीत मालविका बन्सोडने बेट्रीज कोरालेसचा 21-13, 21-15 असा पराभव केल्यामुळे भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. महिला दुहेरीत तनिषा क्रास्टो आणि ऋतापर्ण पांडा यांनी पॉला लोपेझ-लॉरेना उस्ले यांना 21-10, 21-8 अशी धूळ चारली, तर एकेरीच्या तिसर्‍या सामन्यात, अदिती भट्टने अनिया सेटीएनला 21-16, 21-14 असे पराभूत केल्याने भारताला 3-1 अशी विजयी आघाडी मिळाली. दुहेरीच्या दुसर्‍या लढतीत एन. सिक्की रेड्डी आणि अश्‍विनी पोनप्पा यांना मात्र अझूरमेंडी आणि कोरालेस यांच्याकडून 18-21, 21-14, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. आता मंगळवारी ब गटातील दुसर्‍या साखळी सामन्यात भारतापुढे स्कॉटलंडचे आव्हान असणार आहे.

Exit mobile version