शिंदे गटाला जोरदार धक्का; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने खळबळ
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा नगरपंचायतीत पक्षादेशाचे उल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सात नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र ठरवले असून, या निर्णयामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटाची राजकीय गणिते कोलमडली आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल असून, खळबळ माजली आहे.
काही महिन्यांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी एकत्रितपणे पक्षांतर करत शिंदे गटाची वाट धरली होती. या घटनेमुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ आणि राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसला होता. मात्र, या पक्षांतराविरोधात सुनील तटकरे यांनी आक्रमक भूमिका घेत कायदेशीर लढाई छेडली. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी अलिबाग येथे सविस्तर सुनावणी पार पडली. सर्व बाजूंचा विचार करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, राष्ट्रवादी काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल राष्ट्रवादीसाठी मोठे राजकीय अस्त्र ठरणार असल्याचे बोलले जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तटकरेंच्या रणनीतीचे जिल्हाभर कौतुक होत आहे.
दुसरीकडे, मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटासाठी हा निर्णय मोठा मानहानिकारक पराभव मानला जात आहे. म्हसळा तालुक्यात उभे राहिलेले शिंदे गटाचे बळ एका झटक्यात कमी झाले असून, आगामी निवडणुकांमध्ये या निकालाचा थेट परिणाम दिसून येणार आहे. एकूणच, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे रायगडच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अपात्र ठरविण्यात आलेले नगरसेवक : कमल रवींद्र जाधव, मेहजबिन नदीम दळवी,
असलह असलम कादिरी, फरहीन अ. अजीज बशारद, सुमैया कासम आमदानी, सारा अ. कादीर म्हसलाई, शाहिद सईद जंजिरकर0
