। मुंबई । प्रतिनिधी ।
सरते 2024 वर्ष हे लोकशाही आणि स्वातंत्र्याला खड्ड्यात घालणारे म्हणून लक्षात राहील. आर्थिक प्रगतीची घसरण या वर्षात झाली आहे. धर्मातील लोकशाही की धर्मप्रधान हुकूमशाही यांचा तुंबळ संग्राम देशात सुरु असल्याची टीका शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केली आहे. त्यासोबतच 2025ला सत्य विजयाची पहाट उगवेल, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर हल्लाबोल केला आहे. सरते वर्ष 2024 हे लोकशाही आणि स्वातंत्र्याला खड्डयात घालणारे वर्ष म्हणून दीर्घकाळ लक्षात राहील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आणि दिल्लीत पुन्हा मोदी-शहांची जोडी सत्तेवर आली, मात्र त्यामुळे खोटेपणास प्रतिष्ठा मिळाली. ‘सत्यमेव जयते’ हा भारतीय संविधानाचा नारा पूर्णपणे संपला. सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग, राज्यपाल, लोकपाल या घटनात्मक संस्थांचा कणाच जणू काढून घेतला व बिनकण्याच्या संस्था सत्ताधार्यांच्या आश्रितांप्रमाणे गुजराण करीत असल्याचे चित्र 2024 ने पाहिले असल्याची खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.
अर्थव्यवस्था आजारी आणि पंगू
संजय राऊत यांनी देशातली स्वायत्त संस्था आश्रित झाली असल्याची टीका केली आहे. त्यासोबतच देशाच्या आर्थिक स्थितीवरही भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, मोदी राजवटीत देशाच्या प्रगतीची घसरण झाली, मात्र नैतिकतेची घसरण सर्वात जास्त झाली. भारताची आर्थिक स्थिती साफ खालावली आहे. मोदी यांनी सांगिले होते, भारताला 5 ट्रिलियनची जगातली तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवू, परंतु जागतिक बँकेने मोदींना खोटे पाडले. भारत एक आजारी, पंगू अर्थव्यवस्था बनली असून घोटाळे व लबाड्या वाढल्या आहेत. हे जागतिक बँकेच मत आहे
अधर्माचे राज्य 2025 ला संपेल
लोकशाही आणि स्वातंत्र्याला खड्डयात घालणारे वर्ष म्हणून 2024 ची नोंद केली जाईल. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टावर ताबा मिळवून निवडणुका जिंकणार्यांचे राज्य हा अधर्म आहे. त्या अधर्माचे राज्य 2025 ला संपेल. लोकशाही मार्गाने अधर्माचा पराभव होणे कठीण, परंतु मोदी-शहांच्या कुंडलीतील राजयोग अस्तंगत होताना दिसतोय, असे भाकित शिवसेना ठाकरे गटाने वर्तवले आहे. 2025ला सत्य विजयाची पहाट उगवेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.