। मुंबई । प्रतिनिधी ।
विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत ‘ब’ गटातले आपले वर्चस्व कायम ठेवणार्या महाराष्ट्राने सलग पाचवा विजय मिळवत बाद फेरी जवळपास निश्चित केली आहे. त्यांनी सिक्कीमचे आठ गडी बाद करून आणि 96 चेंडू राखून एकतर्फी विजय मिळवला आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करणार्या सिक्कीमला 50 षटकांत 8 बाद 234 असे रोखले आणि त्यानंतर विजयाचे हे आव्हान 34 षटकांत पार केले. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या ओम भोसले याने पुन्हा एकदा सातत्य दाखवले, परंतु तो शतकापासून सहा धावा दूर राहिला. 101 चेंडूत त्याने 94 धावांची खेळी केली. सिद्धेश वीरनेही आपले सातत्य राखले. त्यानेही 49 चेंडूत 64 धावांची खेळी साकार केली. यष्टीरक्षक फलंदाज निखिल नाईकने नाबाद 46 धावा फटकावल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सिक्कीमने 32 षटकांत 3 बाद 144 अशी सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर त्यांना 90 धावाच अधिक करता आल्या.