नूतन वर्षानिमित्त पर्यटकांत वाढ, व्यावसायिकांमध्ये आनंद
। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. 31 डिसेंबर रोजी पालीत पर्यटकांची मोठी रेलचेल होती. शाळा व महाविद्यालयांना नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे पालीत पर्यटकांची मोठी वर्दळ वाढली आहे. त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांचा व्यवसाय तेजीत आला आहे. मात्र, भाविकांच्या व इतर वाहनांमूळे पालीत वाहतुककोंडी वाढत आहे.
श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून पर्यटन दाखल होत आहेत. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल होत असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत. सुट्टयांमुळे मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले आहेत. लॉजिंग बोर्डिंगवाल्यांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. सध्या मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची आणि खाऊची दुकाने, नारळ, हार, फुल, पापड व मिरगुंड विक्रेते, सरबतवाले, प्रसाद व पेढेवाले आदिंचा व्यवसाय तेजीत आला आहे. अनेक भाविक स्वतःची वाहने घेवून येत आहेत. तर काही लक्झरी किंवा खासगी बसेसने येतात. यामुळे पालीतील रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. काहीवेळेस नाक्यावर तैनात असलेले वाहतूक पोलीस तसेच पूर्णवेळ बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भाविकांच्या येणार्या गर्दीचा अंदाज घेऊन योग्य व्यवस्थापन व नियोजन करण्यात आले आहे. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद (भोजन) उपलब्ध असल्याचे पाली बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष वैभव आपटे यांनी सांगितले.
सुरक्षारक्षक तैनात आहेत. भाविकांना राहण्यासाठी सुसज्ज सर्व सोयी-सुविधांनीयुक्त आधुनिक दोन भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहेत. तसेच सुसज्ज स्वच्छता गृहदेखील उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. याची काळजी घेतली जात असल्याकडेही आपटे यांनी लक्ष वेधले.