गांजा फुकणार्या पुण्यातील पर्यटकांना अटक
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
नववर्षाच्या स्वागतासाठी हडपसर पुणे येथून आलेल्या तरुणांना गांजाचे सेवन करताना श्रीवर्धन पोलीसांनी रंगेहाथ पकडले. श्रीवर्धन येथे नव वर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटकांनी हजेरी लावली होती. परंतु पुणे, हडपसर येथून आलेले तरुण श्रीवर्धन समुद्रकिनारी असलेल्या सुशोभीकरण केलेल्या धुपप्रतिबंधक बंधार्यावरती गांजा घेत असल्याची बातमी श्रीवर्धन पोलिसांना मिळाली. त्यानंतर श्रीवर्धन पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता गांजा पिणारे तरुण आढळून आले.
सनी चव्हाण (27), साहिल सुतार (21), सोमनाथ बनसोडे (23), आशिष राजगिरे (19) आणि शिवा राठोड (19) अशी सर्व आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण हडपसर येथील मांजरी बुद्रुक या ठिकाणचे रहिवासी आहेत. या घटनेची पोलीस हवालदार प्रशांत देशमुख यांनी दिली. श्रीवर्धन पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे व्यसनाधीनता करण्यासाठी येणार्या पर्यटकांना चांगलाच चाप बसणार आहे. त्या पर्यटकांकडे गांजा हा अमली पदार्थ कोठून आला व त्यांनी कसा प्राप्त केला, याबाबत देखील पोलीस चौकशी सुरू आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यु.बी. रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जे. जी. गमाले हे अधिक तपास करीत आहेत.