| रसायनी | वार्ताहर |
इर्शाळवाडीच्या दुर्घटनाग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा सत्कार ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्यावतीने करण्यात आला. 19 जुलै रोजीच्या काळरात्री इर्शाळवाडीची दुर्दैवी घटना घडली. यात 27 जणांचे मृतदेह सापडले, तर 57 जणांना दुर्दैवी घटनेत शासनाने मृत घोषित केले आहे.
प्रशासनाच्या मदतीने अपघातग्रस्त टीम, विविध कंपनी कामगार, सामजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकिय सेवा, पोलीस, आरोग्य सेवा, ग्रामपंचायत, महसूल विभाग यांच्यासह अनेकांनी अहोरात्र मेहनत घेतली. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ग्रामपंचायत चौक यांनी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी यांचा सत्कार केला. यावेळी सन्मान स्वीकारताना अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर म्हणाले की, अशा प्रकारच्या शाबासकीने एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, सत्कार महत्त्वाचा नाही, पण ग्रामपंचायत चौक यांनी ठेवलेली आठवण अतिशय म्हत्त्वाची आहे. त्यामुळे सामाजिक कार्य करण्यास आमचे मन आम्हाला प्रवृत्त करेल.
यावेळी सरपंच रितु ठोंबरे, उपसरपंच राजन गावडे, ग्रामविकास अधिकारी एस.पी. जाधव, निखिल मालुसरे, सुभाष पवार, अजिंक्य चौधरी, पूजा हातमोडे, लक्ष्मी वाघ, महादेव पिरकड, प्राची दबके, नैना झिंगे, विधीतज्ञ रिना सोनटक्के, रूषाली अंबवणे, सुवर्णा राणे, सीता पवार, स्वाती देशमुख, राजीव पाटील, अश्विनी म्हात्रे, कल्पना शिंगवा, अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था उपस्थित होते.







